
अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे,महावितरणचा कर्मचारी थोडक्यात बचावला
- by Rameshwar Gawai
- Jul 07, 2020
- 2112 views
बदलापूर (प्रतिनिधी) : दुरुस्तीच्या कामासाठी विजेच्या खांबावर चढलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला अचानक चक्कर येऊ लागल्याने तो खांबावरून पडण्याची शक्यता होती. परंतु याबाबत माहिती मिळताच कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने मदतीसाठी धाव घेत या कर्मचाऱ्याची सुखरूप सुटका केली.
बदलापूर पूर्व भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात सोमवारी सकाळी ९.३७ वा. च्या सुमारास महावितरणने एसटी लाईनवर दुरुस्तीचे काम सुरू केले होते. हे काम करण्यासाठी दीपक कमाने हे सिनियर टेक्निशियन ३०-३२ फूट उंचीच्या खांबावर चढले होते. मात्र काम करीत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना चक्कर येऊ लागल्याने खाली पडण्याची भीती वाटू लागली. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राहुल सोनटक्के यांनी त्वरित याबाबत कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे फायर ऑफिसर भागवत सोनोने यांना माहिती दिली. त्यावेळी अग्निशमन दलाचे पथक दत्तचौक परिसरात पडलेले झाड बाजूला करण्याच्या कामात व्यस्त होते.परंतु खांबावर चढलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला चक्कर येत असल्याने तो खांबावरून पडण्याची शक्यता होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन फायर ऑफिसर भागवत सोनोने यांनी हातातले काम बाजूला ठेवून तातडीने महावितरणच्या कर्मचाऱ्याची सुटका करण्याच्या सूचना या पथकाला दिल्या.त्यानुसार शैलेश जगताप, विनायक पाटील, संदीप माने, दीपक जाधव, स्टिफन मेहेत्रे, शंकर फुलवरे आदींच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शिडी व रेस्क्यू रोपच्या सहाय्याने या कर्मचाऱ्याला खांबावरून सुखरूप खाली उतरवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या या सतर्कतेचे कौतुक होत आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम