
ठाणे जिल्ह्यात पाच नवी कोरोना चाचणी केंद्र उभारणार -राजेश टोपे
- by Rameshwar Gawai
- Jul 03, 2020
- 1288 views
बदलापुर / प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यात पाच नवी कोरोना चाचणी केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. येत्या दहा दिवसांत अंबरनाथ-बदलापूरसाठी एक तसेच उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदरसाठी प्रत्येकी एक व ग्रामीण भागासाठी एक याप्रमाणे ही चाचणी केंद्र उभारण्यात येणार असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले
कुळगाव बदलापूर नगर परिषद सभागृहात आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे बदलापूर शहराध्यक्ष आशिष दामले अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील व प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.बदलापूर व परिसरातील रुग्णांना कोरोना चाचणीसाठी मुंबईला जावे लागते. त्याचा रिपोर्ट यायला २-३ दिवस लागतात. यासाठी कोरोना चाचणी सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे टोपे यांनी सांगितले. अंबरनाथ व बदलापूर या दोन्ही शहरात बेडची संख्या तसेच रुग्णवाहिकांची संख्या वाढवणे आवश्यक असल्याचे टोपे यांनी नमूद केले. ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १५० बेड वाढवण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. हरणे आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तेथे ५० बेड उपलब्ध होतील. आयसीयू सोडून इतर रुग्णांना तेथे ठेवता येईल. ठाण्यातील छोट्या नगरपालिका, महानगरपालिका व ग्रामीण भागात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. खरतर नगर पालिका महानगरपालिका यांनी आरोग्यसेवा देने हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःची रुग्णालये चालवली पाहिजेत. पण ते चालवू शकत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने अशी किमान १०० बेडची रुग्णांलये उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
व्हेंटिलेटरची कमतरता लक्षात घेता नगर परिषदांना शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून देण्यात आलेल्या ७ कोटींच्या निधीतून ५-५ व्हेंटिलेटर तातडीने विकत घेण्याचा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. नागरिकांना मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. यासंदर्भात जीआर काढण्यात आला असून त्याचा फायदा संपूर्ण राज्याला होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंबरनाथ व बदलापूर या दोन्ही शहरात व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन असलेल्या बेडची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असून तेही लवकरच पूर्ण होतील, असे सांगत डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी शहरातील सर्व डॉक्टरांनी त्यांचे रुग्णालय सांभाळून तीन तास सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. याबाबत इंडियन मेडीकल असोसिएशनलाही विनंती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पालिका सभागृहात बैठक घेतली त्यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, उपसंचालक गौरी राठोड, डॉ. मनीष रेगे, पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे, मुख्याधिकारी दीपक पुजारी, अंबरनाथचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, सहायक पोलीस आयुक्त विनायक नराळे आदी अधिकारी आणि बदलापूर मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यासाठी हेल्पलाईन सुरू करणार
ठाणे जिल्ह्यातील कोणत्या रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत. हे सहजपणे सर्वसामान्य माणसाला कळावं यासाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टळणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम