चार महिने एकही सुट्टी नाही,डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार.

बदलापूर/ प्रतिनिधी :  गेल्या चार महिन्यापासून एकही दिवस सुट्टी  न  घेता रुग्णसेवा करणारे कुळगाव बदलापूर नगर परिषद, बदलापुर ग्रामीण रुग्णालय व सोनिवली येथील कोविड केअर सेंटरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रीयल इस्टेटच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे . 

 रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरीयाच्या नव्या अध्यक्ष डाॅ. श्रद्धा सोमण यांनी बुधवारी  अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि पहिल्याच दिवशी 'डॉक्टर्स डे' साजरा करताना बदलापूरचे कोवीड योद्धे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कै. दुबे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश अंकुश, बदलापूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.अशिलाक शिंदे, आणि सोनिवली कोविड केअर सेंटरचे डॉ. दिनेश समेळ यांचा मानपत्र आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. डाॅ.अंकुश हे कुळगाव, बदलापूर विभागाचे काम पाहतात. डाॅ. शिंदे हे ग्रामीण रुग्णालय आणि सोनिवली येथील कोवीड सेंटरची जबाबदारी सांभाळतात, तर बदलापूरचे डाॅक्टर समेळ यांच्यावर ठाण्याच्या कासार वडवली आणि भाईंदर पाडा येथील कोवीड सेंटरची प्रामुख्याने आणि ठाण्यातील इतर विभागांची जबाबदारी आहे. गेल्या चार महिन्यात या तिघानाही एकही दिवस सुटी मिळालेली नाही. अशा कर्तव्यदक्ष डॉक्टरांचे कौतुक करण्यासाठी त्यांच्या योगदानाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रीयल इस्टेटच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी क्लबचे नवनिर्वाचित सेक्रेटरी डॉ.दिलीप मानगेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट