
लॉकडाउन काळातले बिल माफ करा . भाजपाची मागणी
- by Rameshwar Gawai
- Jul 01, 2020
- 603 views
बदलापूर / प्रतिनिधी : बदलापूरकरांना लॉडाऊन काळातील वीज वापरासाठी देण्यात आलेली बिले अव्वाच्या सव्वा असल्याचा आरोप करून ही बिले संपूर्णपणे माफ करावीत वा ५० टक्केच बिल आकारावे , अशी मागणी बदलापूरातील भाजपाचे माजी नगरसेवक शरद तेली यांनी केली आहे.
२० मार्च २०२० पासून लॉकडाऊन असल्याने महावितरणचे कर्मचारी मीटर रिडींग घेऊ शकले नाहीत. तरीही अनेक ग्राहकांनी ऑनलाईन वीज बिले भरली. असे असताही २० जून २०२० पासुन आलेली ही बिले अव्वाच्या सव्वा आहेत. ५००-६०० रुपये वीज बिल येणाऱ्या ग्राहकांना ६ हजार रुपयांपर्यंत बिले आहेत, हे अन्यायकारक असल्याचे शरद तेली यांनी सांगितले. लॉक डाऊन काळातल्या विजेचे बिल पूर्णपणे माफ करावे वा ५० टक्केच बिल आकारणी करावी, लॉकडाऊन काळातली वीज बिल आकारणी प्रत्येक महिन्याचा वेगवेगळा वीज वापर युनिट स्लॅब प्रमाणे करण्यात यावी, २०मार्च ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वीज बिल न भरल्यामुळे कोणाचेही वीज कनेक्शन कट करू नये, २०मार्च ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत प्रत्येक बिल तीन -चार हप्त्यांमध्ये भरण्याची परवानगी द्यावी व हप्ते केलेल्या रकमेवर कोणत्याही प्रकारची व्याज आकारणी केली जाऊ नये,अशी शरद तेली यांची मागणी आहे. यासंदर्भात महावितरणचे बदलापूर पश्चिम विभागाचे उपकार्यकारी अभियंता मनोज कराड यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती शरद तेली यांनी दिली.
वीज पुरवठ्याचे ऑडिट करावे.
बदलापुरात मार्च ते मे दरम्यान अनेकदा कधी वायर तुटणे, पोल पडणे, आदी तांत्रिक बिघाड होऊन तासनतास वीजपुरवठा खंडित झाला आहे. याव्यतिरिक्त महावितरणनेही तांत्रिक कामासाठी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वा. पर्यंत वीजपुरवठा खंडित ठेवला होता. याबाबत महावितरणने नागरिकांना जाहीर सूचनाही केल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना जवळपास दर आठवड्याला अनेक तास विजेविना रहावे लागले आहे. हे पाहता नागरिकांनी केलेल्या विजेच्या वापराच्या तुलनेत सरासरी आलेले बिल जादा असण्याची शक्यता असल्याने वीज पुरवठ्याचे ऑडिट करण्याची गरज असल्याचे मतही शरद तेली यांनी व्यक्त केले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम