
सोनिवलीत सर्व सोयीसुविधायुक्त कोविडकेअर सेंटर सुरू करा: राष्ट्रवादीची मागणी
- by Rameshwar Gawai
- Jun 28, 2020
- 890 views
बदलापूर / प्रतिनिधी : बदलापुरातील सोनीवली येथील बीएसयुपी घरकुल योजनेच्या आणखी इमारतींमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करून तेथे आयसीयू, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.
बदलापूर पश्चिम भागात सोनिवली येथे बीएसयूपी घरकुल योजनेच्या इमारतींमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाहता याबाबत तातडीने नियोजन करण्याची गरज आहे. त्यामुळे सोनिवली येथील बीएसयूपी योजनेच्या उर्वरित ६ इमारतींमध्येही सर्व सोयीसुविधा युक्त कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे,अशी मागणी आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी सांगितले. उर्वरित इमारतींमध्ये कोविड केअर सेंटर सुरु केल्यास तेथे नवीन रुग्णांसाठी त्वरित जागा उपलब्ध करता येईल. शासनाने बदलापूरला कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी दिलेल्या ७ कोटी रुपयांच्या निधीतून याठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व आयसीयु सारख्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांवर याठिकाणी मोफत उपचार करावेत, अशी आपली मागणी असून यासंदर्भात कार्यवाही करण्याबाबत नगर परिषदेच्या प्रशासकांना विनंती करण्यात आली असल्याचे कालिदास देशमुख यांनी सांगितले.
पालिका सभांचे थेट प्रक्षेपण व्हावे
कुळगाव बदलापूर नगर परिषदेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात घेतलेल्या निर्णयांची तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, यासाठी नगर परिषदेच्या सर्व सभा,बैठकांचे स्थानिक केबल वाहिनी, यु ट्यूब, फेसबुक लाईव्ह आदी माध्यमातून थेट प्रक्षेपण करावे, अशी आपली मागणी असल्याचे कालिदास देशमुख यांनी सांगितले. यासंदर्भात आपण नगर परिषद प्रशासनाकडे मागणी केली असल्याचे त्याांनी सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम