बदलापुरात पाण्या 'वरून मजीप्रा, महावितरणमध्ये वाद गुरुवारी पाणी नसल्याने बदलापूरकरांचे हाल .

बदलापूर/ प्रतिनिधी  : बदलापूरवासीयाना  गुरुवारी पाण्याविना राहावे लागले आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली असताना यावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महावितरणमध्ये यात चूक कोणाची यावरून चांगलाच वाद निर्माण  झाला  आहे. तर शहरवासीयाना  सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी या दोन्ही यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याची गरज असताना त्यांच्यातच वादाच्या फैरी सुरू असल्या मुळे  शहरातील नागरिकानी खेद व्यक्त करुन नाराजी दर्शविली आहे .  

बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जल शुद्धीकरण केंद्र असलेल्या बॅरेज येथील वीज पुरवठा खंडित झाल्याने बदलापूर शहरात गुरुवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरात पाणीपुरवठा होणार नाही असे संदेश समाज माध्यमांद्वारे स्थानिक लोकप्रतिनिधींपर्यंत पोहचवले ते संपूर्ण शहर भर पसरले याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना लागताच  त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना फोन करून आपली बाजू मांडली. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. महावितरणकडून बॅरेज येथील जलशुद्धीकरण केंद्राला पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागातून वीज पुरवठा केला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत भागात झालेल्या बिघाडामुळे येथील  वीज पुरवठा खंडित झाल्याचे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहूल सोनटक्के यांनी सांगितले.  तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी ही गोष्ट मान्य करायला तयार नाहीत. आमच्याकडे अशी यंत्रणाच नाही की एकाच वेळेस दोन्ही फिडर सुरू होतील असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र दशोरे यांनी सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महाराष्ट्र महावितरण या दोघांच्याहि वादात बदलापुरकर मात्र पाण्या वाचून गुरुवारी वंचित राहिला.त्याचा परिणाम हा पुढील दोन दिवस बदलापूरकरांवर होणार आहे. आधीच बदलापूर शहरात अनेक भागात पाणीटंचाई असताना अशा प्रकारे दोन यंत्रणांमध्ये असलेल्या समन्वय आणि वाद हा बदलापूरकरांना मानसिक त्रास देणारा ठरत आहे. आधीच वीज आणि पाण्याची 

समस्या जाणवत असलेल्या शहरातील महत्त्वाच्या यंत्रणा अशा प्रकारे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी बघायचं कुणाकडे असा प्रश्न सर्वसामान्य बदलापूर करांना पडला आहे. बदलापुरात अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी गेल्या अनेक महिन्यांपासून वाढत आहे. तर बदलापूरातील अनेक भागात पाणीपुरवठा होत नसल्याचेही प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या दोन यंत्रणांनी समन्वयाने काम करून नागरिकांना दिलासा देण्याऐवजी आपापसातील वाद विकोपाला गेल्याने शहरातील नागरिक पाण्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे या पुढील काळात मजीप्रा आणि महावितरण यांनी समन्वयाने काम करून शहरातील नागरिकांना सुरळीत सेवा सुविधा द्याव्यात अशी अपेक्षा सर्वसामान्य बदलापूरकर व्यक्त करीत आहेत.

महावितरण देणार वरिष्ठ कार्यालयाला अहवाल. 

बदलापुरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या बॅरेज जलशुद्धीकरण प्रकल्प येथे घडलेल्या या बिघाडाबाबत महावितरणचे  पूर्व आणि पश्चिम विभाग एकत्र मिळून सर्व्हे करणार असून तो अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करणार आहे. या प्रकारात महावितरणच्या एखाद्या कर्मचार्‍याला जीव गेला असता याचीही माहिती या अहवालात दिली जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले. शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा आणि वीज प्रवाह खंडित होऊ नये म्हणून महावितरणने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पुर्व आणि पश्चिम विभागातून वीजपुरवठा दिला आहे. मात्र जर मजीप्रा कडून ही  यंत्रणा योग्य प्रकारे हाताळली जात नसेल आणि असे प्रकार घडत असतील तर आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनास आणून देऊ असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे .

संबंधित पोस्ट