नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीला स्थगिती
- by Adarsh Maharashtra
- Jun 25, 2020
- 1667 views
नवी मुंबई (शेखर चंद्रकांत भोसले) : नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या जागी वस्त्रोद्योग विभागाचे अभिजित बांगर यांच्या नियुक्तीचे आदेश बुधवारी राज्य शासनाने काढले होते. परंतु काल रात्री अचानक चक्रे पालटवून बुधवारी रात्री या बदली आदेशाला सरकारकडून स्थगिती मिळवण्यास अण्णासाहेब मिसाळ यांना यश मिळाले आहे. यामुळे नवी मुंबई महापालिका आयुक्त पदी पुन्हा अण्णासाहेब मिसाळ हेच राहणार आहेत.
नवी मुंबईतील कोरोनाचा वाढता फैलाव व त्याअनुषंगाने वाढती रूग्णसंख्या तसेच इतर स्थानिक व वरिष्ठ पातळीवरील राजकारण यामुळे बुधवारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले होते. बदलीचा आदेश मिळताच ही बदली रोखण्यासाठी मिसाळ यांनी ताबडतोब व्यूहरचना आखली व मार्च ते आजपर्यंतच्या कोरोना काळात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत आपण कुठेही कमी पडलो नसल्याचे मिसाळ यांनी वरिष्ठांच्या लक्षात आणून दिले. प्रत्येक विभागात सुरू असलेले मास्क स्क्रिनिंग, नव्याने सुरू केलेले वाशी एक्झिबिशन सेंटर येथील १२०० बेडचे अद्ययावत केव्हिड रूग्णालय, पावसाळी कामे, यांच्यासह इतर सर्व कामांचा अहवाल त्यांनी वरिष्ठांसमोर ठेवला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य विभाग यांच्या आदेशाने नवी मुंबई महानगर पालिका हद्दीतील रुग्णसंख्या कमी होण्यासाठी व कोरोनाला रोखण्यासाठी सर्व कार्यवाही केली जात होती व सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते हे त्यांनी वरिष्ठांच्या नजरेत आणून दिले त्यामुळे बदलीला स्थगिती मिळावी अशी विनंती आयुक्त मिसाळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समजते. बुधवारी रात्री उशीरापर्यंत मिसाळ मंत्रालयात होते. तेथे घडलेल्या घडामोडींमुळे काल रात्री मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांच्या बदलीला स्थगिती दिल्याची माहिती मिळाली. अंतिमतः गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त दालनात हजर होऊन आपल्या कामाला सुरूवात देखील केली. याबाबत मिसाळ यांना विचारले असता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थगिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
नवे आयुक्त अभिजीत बांगर गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजता महापालिकेत पदभार घेणार होते. शिवाय दहा वाजता सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांची बैठक घेणार होते. त्यानंतर विभाग अधिकारी यांची बैठक होणार असल्याने सर्व अधिकारी सकाळी साडेनऊ वाजता महापालिका मुख्यालयात उपस्थित राहतील असे आदेश बुधवारी काढण्यात आले होते. मात्र गुरूवारी सकाळी मिसाळांनी पदभार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम