महालक्ष्मी एक्सप्रेसची पुनरावृत्ती नको . किसन कथोरे यांची रेल्वे प्रशासनाला सूचना

बदलापूर / प्रतिनिधी : गेल्या वर्षी रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस महापुरात अडकली,त्याची पुनरावृत्ती होता कामा नये अशी स्पष्ट सूचना आमदार किसन कथोरे यांनी रेल्वे प्रशासनाला दिली. कोरोनाशी लढतानाच पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठीही  तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज राहणार असल्याचे कथोरे यांनी सांगितले आहे . 

 कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सभागृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. गेल्या वर्षी २६ जुलै रोजी महापूर आला. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याने महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर स्थानकात न थांबता पुढे गेली आणि महापुरात अडकली, असे आमदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच यापुढे त्याची पुनरावृत्ती न होण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषद प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी प्रास्तविक तर मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी आभार प्रदर्शन केले. तहसीलदार जयराज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त विनायक नरळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी सुरेंद्र दशोरे आदीसह विविध खात्यांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.  

गेल्या वर्षी २६ जुलै आणि ४ व ५ ऑगस्ट रोजी महापूर आल्यावर जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले होते. हि परिस्थिती लक्षात घेऊन यंदा पूर्ण खबरदारी प्रशासनाने घेतली असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने आत्ताच बारवी धरणात पाण्याचा साठा मुबलक असल्याने  बारवी धरण लवकर भरणार असल्याचे सांगून प्रशासनाने बारवी धरणाच्या अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहून प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची महत्वपूर्ण सूचनाही आमदार किसन कथोरे यांनी केली. त्यावर यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात येईल. नागरिकांनाही वेळोवेळी सूचना देण्यात येऊन सतर्कता बाळगण्यात येणार असल्याचे जगतसिंग गिरासे यांनी सांगितले. सहायक पोलीस आयुक्त विनायक नराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र, दिपक देशमुख आदींनीही महत्वपूर्ण सूचना केल्या.

संबंधित पोस्ट