तिकीट खिडक्यांवर प्रवाशांचा रांगा.अपुऱ्या गाड्यांमुळे कर्मचार्‍यांचे हाल.

बदलापूर / प्रतिनिधी : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालेल्या लोकल सेवेला पहिल्या दिवशी फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी दुसऱ्या दिवशी (ता.१६) बदलापूर रेल्वे स्थानकात कर्मचाऱ्यांची गर्दी पहायला मिळाली. त्यामुळे सोशल डिस्टनसिंगचा मात्र फज्जा उडाल्याचे दिसत होते. मंगळवारी सकाळपासूनच कामाला जाणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी तिकीट खिडक्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेकांचे पास संपले असल्याने नवीन पास काढण्यासाठी देखील गर्दी होत आहे. प्रवाशांना वेळेत तिकीट मिळावे यासाठी रेल्वे प्रशासनाने तिकीट खिडक्यासह एटीव्हीएम मशिनही कार्यान्वित केल्या होत्या. मात्र कर्मचाऱ्यांच्या जादा संख्येमुळे प्रवाशांना अर्धा ते पाऊण तास तिकीट खिडक्यांवर उभे राहून तिकीट काढावे लागत होते. पुढील दोन ते तीन दिवस प्रवाशांचीही गर्दी कायम राहणार असल्याने रेल्वे प्रशासनाने त्या दृष्टीने नियोजन केले आहे. आरपीएफ,जीआरपी, रेल्वे टीसी आणि कर्मचारी हे प्रवाशांना रांगेत लावण्याचे काम करत होते. मात्र रांग वाढत गेल्याने आणि पाऊसही आल्याने स्टेशन परिसरात सभोवताली करून शेडमध्ये रांग लावण्यात आली. येथेही सोशल डिस्टंसिंग पाळणे जवळपास अवघडच असल्याने प्रवाशांमध्ये देखील एक चिंतेचे वातावरण होते. बसला असलेल्या गर्दीत रांगेत उभे राहण्यापेक्षा एकदाच पास काढून रेल्वेने प्रवास करणे सोपे जाईल. म्हणून बहुतांश सर्वच कर्मचारी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवस रेल्वे तिकिट खिडकिवर गर्दी राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पास काढण्यासाठी ओळखपत्र आवश्यक असल्याने व ते पाहूनच टिकीट आणि पास दिला जात असल्याने तिकीट काढण्यासाठी वेळ लागत असल्याचं प्रवाशांनी सांगितले.

       हव्यात आणखी लोकल गाड्या . 

मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर १२० गाड्या जरी सुरू केल्या असल्या तरी पहाटे ४ ते सकाळी ९ या वेळात बदलापूर येथे अर्ध्या ते एक तासाच्या फरकाने गाड्या उपलब्ध आहेत. मात्र ९ नंतर थेट दुपारी एक वाजता गाडी असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. सकाळी ९ ते दुपारी १ च्या दरम्यान रेल्वे प्रशासनाने किमान एक तासांनी एक तरी गाडी सुरू करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

संबंधित पोस्ट