शिवसेना शहरप्रमुखांच्या आवाहनानंतर पुढे आले कोविड रुग्णालयाच्या मदतीसाठी हात

अंबरनाथ/ प्रतिनिधी :अंबरनाथ शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शहरातील रुग्णांना शहरातच आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने डेन्टल कॉलेजमध्ये कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयासाठी शहरातील दानशूरांनी पुढे यावे या  शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी मदतीचा हात दिला आहे.

डेंटल कॉलेज येथे उभारण्यात येणाऱ्या कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, प्रशासक जगतसिंग गिरासे, मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर हे सातत्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामाची पहाणी करीत आहेत.  शिवसेना शहर शाखा अंबरनाथ व अंबरनाथ मधील तमाम शिवसैनिकांच्या वतीने शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी अंबरनाथ मधील कोविड १९ च्या रुग्णांसाठी गरम पाणी पिण्याची सोय व्हावी म्हणून "हॉट वॉटर, वॉटर फिल्टर मशीन" दिल्या. डेंटल कॉलेज व सिटी हॉस्पिटल मध्ये प्रत्येकी एका खोलीत एक असे १० मशीन देऊन त्यांनी सहकार्य केले आहे. 

त्याचप्रमाणे अंबरनाथमधील सर्व दानशूर व्यक्तींनाही त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला  प्रतिसाद देत उद्योगपती बेचर पटेल यांनी २ ईसीजी  मशीन, १० रक्तदाब तपासाच्या मशीन, उद्योगपती राकेश बक्षी यांनी ४० बेड व एका खोलीची संपूर्ण ऑक्सिजन मशीन देण्याची सोय, भैरव ज्वेलर्सकडून बसायच्या खुर्च्या आदी मदत  करण्यात आली आहे. डेंटल कॉलेज येथे उभारण्यात येणाऱ्या कोविड हॉस्पिटल साठी अंबरनाथ तालुका पत्रकार परिषद आणि पंकज पाटील यांच्यावतीने दहा लिटरचे पाच गिझर देण्याचा  निर्णय घेतला आहे. पालिका आपल्या स्तरावर योग्य ते प्रयत्न करीत आहे. परंतु समाजहिताच्या दृष्टीने दानशूर व्यक्तींनी देखील पुढाकार घेऊन या युद्धात सहभाग नोंदविण्याचा आणि आपले योगदान देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट