
उल्हासनगर ,अंबरनाथ,बदलापूरला पावसाचा तडाखा: २१ झाडे कोसळली.
- by Rameshwar Gawai
- Jun 03, 2020
- 1340 views
बदलापूर / प्रतिनिधी : उल्हासनगर अंबरनाथ व बदलापूर शहराला बुधवारी (ता.३) पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अंबरनाथ व बदलापूर व उल्हासनगर शहरात मिळून २१ हुन अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. त्यानंतरही जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे.
सकाळपासून दुपारपर्यंत बदलापुरात मानव पार्क, बेलवली बोगद्याजवळील बंगला, जुना कात्रप रोड, बदलापूर गाव पोलीस चौकी, बदलापूर ग्रामीण रुग्णालय, वडवली तलाव मोहनानद नगर आदी दहा ठिकाणी दहा झाडे कोसळली आहेत. अंबरनाथमध्ये छाया हॉस्पिटलजवळ,खुंटवली, लोटे गार्डन,कैलास नगर,भवानी चौक,आशीर्वाद हॉस्पिटल, बारकू पाडा आदी अकरा ठिकाणी झाडे कोसळली आहेत.तर उल्हासनगर मध्ये सपना गार्डन जवळ झाड पडले असुन नाना नानी पार्क येथे सुध्दा झाडे पडली आहेत . दुपारपर्यंत कोसळलेल्या झाडांची ही आकडेवारी आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यात आलेली झाडे बाजूला केली असल्याची माहिती अंबरनाथ व कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे फायर ऑफिसर भागवत सोनोने यांनी दिली आहे.तर उल्हासनगर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नेटके यानी आपल्या पथका सह उन्मळुन पडलेले झाडे हटवन्याचे काम केले . दरम्यान कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक पूजारी यांनी निसर्ग चक्रीवादळ अनुषंगाने अग्निशमन दल प्रमुख भागवत सोनोने यांनी तयार केलेल्या क्यूआरटी टीम व बचाव साहित्याची पाहणी करून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना अग्निशमन दलाला दिल्या.
नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस रस्त्यावर
उल्हासनगर ,अंबरनाथ , बदलापुरात सकाळपासून जोरदार वारा व पाऊस सुरू आहे.त्यामुळे या तीन्ही शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस तैनात होते. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत होते. त्याच बरोबर वारा व पावसाने काही मोटरसायकल घसरून चालक पडल्याच्या घटनाही घडल्या. या नागरिकांना मदत करून सुखरूप घरी जाण्यास पोलिसांनी सहकार्य केले. याबद्दल अनेक नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम