
बदलापुरच्या कोविड केअर सेंटरमध्ये अपुऱ्या सोयीसुविधा
महिला रुग्णाची सोशल मीडियावर पोस्ट
- by Rameshwar Gawai
- Jun 01, 2020
- 432 views
बदलापूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच मे महिन्यात बदलापूरच्या सोनिवली येथे असलेल्या बीएसयुपी घरकुल योजनेच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण झाले. मात्र त्याच्या दोन दिवसानंतरही येथे वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर उपलब्ध नसल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाने कसेबसे येथे डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करून दिले. मात्र त्यानंतरही या केंद्राच्या समस्या संपत नसल्याचे समोर आले आहे. अस्वच्छता, पाणी, जेवणाच्या वेळा अशा अनेक समस्यांबाबत खुद्द रूग्णांनी फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांच्या मदतीने आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर आता पुन्हा येथील अस्वच्छता, आहाराचे वेळापत्रक आणि रूग्णांची होणारी हेळसांड एका महिला रुग्णाने फेसबुकच्या माध्यमातून मांडली आहे.दरम्यान, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिपक पुजारी यांच्याशी संपर्क साधला असता काही तक्रारी असतील तर त्या सोडवल्या जातील. अन्न व औषधे वेळेवर देण्यात येत आहे. मात्र तरीही पुन्हा संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई कीट घालून स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम