प्रदूषण मंडळाच्या इशाऱ्यानंतर वालधुनी नदीतील प्रदूषणाला बसला आळा


अंबरनाथ / प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या इशाऱ्यानंतर वालधुनी नदीतील प्रदूषणाला आळा बसला आहे. काही रासायनिक कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यामुळे वालधुनी नदीच्या पाण्याचा रंग लाल झाला होता. याबाबत पर्यावरण प्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच याप्रकरणी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने रासायनिक कंपन्यांना कारवाईचा इशारा दिला होता. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाउनमुळे गेले दोन महिने ठप्प असलेल्या एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या तसेच जीन्स वॉश उद्योग यांच्यामुळे वालधुनी नदी काही काळापुरती का होईना प्रदूषण मुक्त झाली होती. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनीही समाधान व्यक्त केले होते. मात्र अवघ्या काही दिवसातच जल प्रदूषण मुक्त वालधुनी नदीची ही अपेक्षा फोल ठरली होती, एमआयडीसीमधील उद्योग सुरु करण्यास राज्य शासनाने गेल्या आठवड्यात परवानगी दिल्यानंतर एमआयडीसीतील इतर कारखान्यांसह केमिकल कंपन्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या आठवड्यात एमआयडीसीतील काही रासायनिक कंपन्यांतून सोडण्यात आलेले रसायनमिश्रित पाणी वालधुनीच्या प्रवाहात मिसळल्याने अंबरनाथ आणि उल्हासनगर रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या भागातून वाहणाऱ्या वालधुनीचा प्रवाह गडद लाल झाला होता. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करून  प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे रासायनिक कंपन्यांच्या या बेजबाबदार कृत्याबाबत तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत अंबरनाथ, बदलापुर एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांना सज्जड दम भरत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच वालधुनीत प्रक्रिया न केलेले रासायनिक पाणी सोडणाऱ्या रासायनिक कंपन्यांचा शोधही प्रदूूूषण नियंत्रण मंडळाकडून घेतला जात असून काही कंपन्यांना नोटीसही बजावली जाणार असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसापासून वालधुनीचा प्रवाह पुन्हा एकदा रासायनिक पाण्यापासून होणाऱ्या प्रदूषणपासून मुक्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित पोस्ट