
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची मुंबईत राहण्याची होणार व्यवस्था.मंत्री एकनाथ शिंदे .
- by Rameshwar Gawai
- May 15, 2020
- 735 views
बदलापूर / प्रतिनिधी : मुंबईत काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची लवकरच मुंबईतच राहण्याची व्यवस्था होण्याची चिन्हे आहेत.मुंबई महापालिकेला याबाबत विनंती करण्यात आली असून तशी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
बदलापुरात माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या १२० बेडच्या कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता.१४) संध्याकाळी उशिरा लोकार्पण करण्यात आले. आमदार किसन कथोरे, नगराध्यक्ष प्रियेश जाधव, शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे, ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांच्यासह नगर परिषदेतील नगरसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. त्यांनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी कर्मचाऱ्यांना मुंबईत ये-जा करण्यास प्रतिबंध करण्या बाबतचा कल्याण डोंबिवली तसेच अंबरनाथ व बदलापूर नगर परिषदेने घेतलेला निर्णय मागे घेण्यात आल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता त्यांनी ही माहिती दिली.अत्यावश्यक सेवेत मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुंबईत राहण्याची व्यवस्था झाली तर त्यांचा प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रादुर्भावही टाळता येईल, त्यामुळे याबाबत मुंबई महापालिकेला विनंती करण्यात आली आहे. अशाप्रकारचे निर्णय ताबडतोब घेता येत नाहीत. राहण्याची व्यवस्था झाल्यानंतर आपण तो निर्णय घेऊ शकतो,असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कुळगाव बदलापूर नगर परिषद व ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून १२० बेडचे हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयासाठी वामन म्हात्रे व त्यांच्या टीमने इतर आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करून दिली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आवश्यकतेनुसार या सेंटरची क्षमता ५०० ते ६०० बेडपर्यंत वाढवण्यात येईल. बेड अभावी कोरोना रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी ४००,५००, १००० बेडचे केअर सेंटर उभारून ५ हजार बेड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाहीही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम