अंबरनाथमधील ५०० बेडचे कोविड केअर सेंटर आठवड्याभरात होणार सज्ज !
शासकीय यंत्रणे सह खासदार डॉ. शिंदे यांचा कामकाजाचा पाहणी दौरा .
- by Rameshwar Gawai
- May 15, 2020
- 682 views
अंबरनाथ / प्रतिनिधी :कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वेगाने पसरत असताना, प्रत्येक नगरपालिके कडून कोरोनाशी लढा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून अंबरनाथ नगरपालिकेने चिखलोली येथे ५०० बेडचे कोविड केअर सेंटर आणि डेडीकेट कोविंड हेल्थ सेंटर उभारण्यात येत असून या इमारतीच्या कामकाजाची पाहणी गुरुवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शासकीय आणि आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यां सोबत चिखलोली येथे जाऊन केली. येत्या दहा दिवसात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांची नियुक्ती करत हे कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश यावेळी खासदार शिंदे यांनी मुख्याधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक वेगाने होत आहे. त्यासाठी सर्व महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात भविष्यातील रुग्ण वाढीचा विचार करता, कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर यांची यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे. सध्या अंबरनाथ शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्या वाढीचा वेग कमी असला तरी अंबरनाथ शेजारी असणाऱ्या बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांमध्ये मात्र वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे भविष्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढीचा विचार करता अंबरनाथ नगरपालिकेकडून अंबरनाथ पश्चिम भागातील चिखलोली येथील डेंटल कॉलेजच्या इमारतीत ५०० बेडचे कोविड केअर सेंटर आणि डेडीकेट कोविड हेल्थ सेंटर उभारण्यात येत आहे. या कोविड सेंटरच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, उल्हासनगर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर, शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी तसेच आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबत चिखलोली येथील डेंटल कॉलेजच्या इमारतीत सुरू होणाऱ्या कोविड सेंटरच्या कामकाजाची पाहणी केली. डेंटल कॉलेजची इमारत गेल्या काही महिन्यापासून दुरावस्थेत असल्याने या ठिकाणी युद्धपातळीवर इमारतीच्या आतील भागातील दुरुस्ती, रंगरंगोटीचे तसेच विद्युत उपकरणे बसवणे, रुग्णांसाठी अत्यावश्यक असणारे ऑक्सिजन पाईपची यंत्रणा यांचे काम सुरू आहे. तसेच या कोविड सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर आणि परिचारिका यांची गरज लागणार असल्याने नगरपालिकेकडून शहरातील डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नोंदणीसाठी एक वेबसाइट तयार करण्यात आली आहेत. गुरुवारपर्यंत या वेबसाईटवर एकूण २१० डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. या सर्व व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची योग्य मानधनावर लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याचे तसेच इमारतीतील रंगरंगोटी तसेच महत्त्वाची कामे झाल्यास येत्या आठवड्यात रुग्णांसाठी बेड आणि आणि इतर तांत्रिक वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यात येणार असून त्यानंतर तात्काळ येथे ५०० बेडचे कोविड केअर सेंटर आणि डेडीकेट कोविड हेल्प सेंटर सुरु करणार येणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम