
बदलापूरात उभारणार शंभर बेड्चे कोविड केअर सेंटर .
- by Rameshwar Gawai
- May 11, 2020
- 494 views
बदलापूर : बदलापूरात शंभर बेड्चे कोविड केअर सेंटर उभारले जाणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यासाठी वैद्यकीय मदत देणार असून बेड व इतर सामुग्री देण्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी जाहीर केले आहे. शहरातील लक्षणे नसलेल्या रुग्णांवर या रुग्णालयात उपचार करणे शक्य होणार आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णालये रुग्णांनी भरू लागली आहेत. रुग्णालयांची क्षमता संपत आल्याने मोठ्या गृहसंकुलांमध्ये, इमारतींमध्ये बेडची तयारी केली जात आहे.शहरातील रुग्णांची संख्या वाढत असताना बदलापूरसारख्या शहरातून सहा शहरांमध्ये रुग्णांना नेणे जिकिरीचे होऊ शकते. त्यामुळे शहरातील वाढत्या रुग्णांसाठी आणि त्यांची शहरातच सोय करण्यासाठी बदलापूर शहरातच कोविड केअर सेंटर उभारण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख व माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी केली होती. त्यासाठी आवश्यक ती मदत देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती. त्यांच्या या मागणीचा जिल्हा पातळीवर सकारात्मक विचार होऊन येत्या काही दिवसात बदलापूर शहरात कोविड केअर सेंटर उभारले जाणार आहे. बदलापूर पश्चिम भागात सोनीवली येथे असलेल्या बीएसयुपी प्रकल्पात हे १०० बेड्चे कोविड केअर सेंटर उभारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आठवड्याभारत त्याचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली आहे. शहरातल्या बहुतांश लक्षणे नसलेल्या रुग्णांवर येथे उपचार करणे सोपे होणार आहे. त्यांना याच शहरात असल्याने मानसिक आधार मिळू शकेल आणि मोठ्या शहरातील रुग्णालयांवर वाढत असलेला बेडचा ताणही कमी होण्यास मदत होईल, असेही पवार म्हणाले.तर शहरातल्या रुग्णांना शहराबाहेर जाण्याची गरज पडू नये, यासाठी आम्ही शहरात कोणत्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु करता येईल याबाबत चाचपणी सुरु केली होती. बीएसयुपी येथे सर्व बाबी सकारात्मक असून त्यानुसार तेथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळाली असल्याचे वामन म्हात्रे यांनी सांगितले. या कोविड सेंटरसाठी आपण १०० बेड व इतर आवश्यक सामुग्री देणार असून डॉक्टर, परिचारिका , सहायक आणि इतर कर्मचारी उपलब्ध झाले असल्याचे वामन म्हात्रे यांनी स्पष्ट केले. येत्या गुरुवारपर्यंत या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम