झिंग झिंग झिंगाट
- by Adarsh Maharashtra
- May 05, 2020
- 1503 views
समाजावर आलेल्या संकटाच्या काळातच पैसा कमावण्याची खरी संधी असते हे लॉक डाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी दाखवून दिले आहे .अशावेळी सरकारने तरी का मागे राहावे? म्हणून तर राज्याची महसुली तूट भरून काढण्यासाठी दारूची दुकाने सुरू करायला परवानगी देण्यात आली. तसा दारू हा महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्रातील अनेक विचारवंत, कला क्षेत्रातील लोक, साहित्यिक, राजकारणी आणि सर्वसामान्य माणसासाठी सुद्धा दारू हे एक प्रकारे उत्साहवर्धक टॉनिक आहे. त्यामुळेच एकच प्याला मधील तळीरामाचे दारु विषयक तत्वज्ञान सर्वांनी मान्य केलेय. कवी, लेखक, कलावंत यांच्या प्रतिभेच्या पंखांना दारू मुळेच बळ मिळाले असा इतिहास सांगतो. आमचे एक मित्र आणि प्रख्यात गुन्हे कथाकार यांच्या टेबलावर पेन आणि कागद याच्या सोबत व्हिस्कीची बाटली असायची आणि जेवणावर जसे माणसाला पाणी लागते तसे लिहिताना ते घोट घोट दारू पीत असत. त्यांच्या कथा आणि कादंबऱ्या गाजल्या. मात्र त्यांनी जराही संकोच न बाळगता आपल्या यशाचे श्रेय चक्क दारूला दिले. अरुण सरनाईक आणि काशिनाथ घाणेकर यांच्यासारखे दिग्गज अभिनेते दारू प्यायल्या शिवाय स्टेजवर यायचे नाहीत किंवा शूटिंगच्या काळात कॅमेरा समोरही यायचे नाहीत. दारू आणि महाराष्ट्र, तसेच दारू आणि मराठी माणूस यांचं ऐक अजोड नात आहे .काही विचारवंत तर दारू प्यायल्यानंतरच दारू शरीराला किती आणि कशी हानिकारक आहे यावर इतरांना मार्गदर्शन करतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे महाराष्ट्राचे दारुशी अतूट नाते आहे आणि असे असताना जर माणसाला दीड महिना दारू मिळाली नाही तर त्याची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. आणि पिणाऱ्यांची हीच अडचण ओळखून सरकारने दारूची दुकाने उघडायला परवानगी दिली त्यामुळे बिचाऱ्या ऋषी कपूरच्या आत्म्याला शांती लाभली असेल कारण दारूची दुकाने उघडा अशी पहिली मागणी ऋषी कपूरने केली होती .पण आता काही सामाजिक आणि महिला संघटना सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात उभ्या राहिल्यात त्यामुळे दारुवरून महाराष्ट्रात वैचारिक झिंग झिंगाट सुरू झालाय. आता प्रश्न असा आहे की रेड झोन मध्ये सुद्धा दारूची दुकाने सुरू करण्या इतपर्यंत महाराष्ट्र सरकार दारू बाबत आग्रही का? केवळ सरकारला दारुतून १२५० कोटीचा महसूल मिळणार एवढं एकमेव कारण या निर्णय मागे आहे की आणखी काही करणे आहेत. महाराष्ट्रातले राजकीय पुढारी आणि दारू माफिया यांचे साटेलोटे महाराष्ट्रासाठी काही नवे नाहीत पण जर दारू माफियांच्या दबावापोटी दारूची दुकाने चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला असेल तर दारूची दुकाने चालू केल्यानंतर जे दुष्परिणाम समोर येणार आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार? दारूची दुकाने सुरू होणार असल्याची बातमी समजताच काल सकाळी ७ वाजल्यापासूनच दारूडयांनी दुकानां समोर रांगा लावल्या होत्या काही ठिकाणी तर सोशल डिस्टन्स ही पाळले जात नव्हते. लॉक डाऊन मुळे बहुतेक सगळी नोकरदार मंडळी, शाळा कॉलेजातील मुले घरात आहेत अशा वेळेस कुटुंबातील कुणी दारू प्याला आणि दारूच्या नशेत त्याने धिंगाणा घालयला सुरुवात केली, दारूच्या नशेत बायको किंवा मुलांना मारहाण केली तर अशा कौटुंबिक हिंसाचाराला जबाबदार कोण? लॉक डाऊन नसतानाच्या काळातली परिस्थिती वेगळी होती. समजा भांडण तंटा झाला तर पोलिस ठाण्यात जाता येत होते पण आता लॉक डाऊनच्या काळात रिक्षा टॅक्सी किंवा अन्य वाहने बंद आहेत शिवाय पोलीसही लॉक डाऊनच्या बंदोबस्तात व्यस्त आहेत अशावेळेस दारुवरून झालेल्या मारहाणीच्या तक्रारींचे काय? दारूडयांच्या हातून खूनासारखे गंभीर गुन्हे घडले आहेत तसेच प्रकार आताही घडू शकतात. गुन्हेगारीच्या एकूण घटनांपैकी ४५ टक्के घटना या दारू वरून झालेल्या वादातून घडल्या आहेत आणि हे ठाऊक असतानाही केवळ महसुलापोटी जर सरकारने दारूची दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली असेल तर मटका जुगार आणि वेश्या व्यवसाय यावरही कर आकारून त्यांनाही परवानगी द्या म्हणजे सरकारला आणखी कर मिळून सरकारची गरिबी दूर होईल. सध्या राज्यातील परिस्थिती काय आहे याचा तरी सरकारने विचार करायला हवा होता एकतर तुम्ही लॉक डाऊन ची कठोरपणे अमलबजावणी करीत नसल्याने कोरोना झपाट्याने फैलावतो आहे आणि आता दुकाने उघडायला परवानगी देऊन परिस्थिती अधिकच गंभीर बनवली आहे.
आज जर गरज कसली असेल तर प्रवासी वाहतूक सुरू करण्याची गरज आहे. कारण देशात किंवा महाराष्ट्रात फक्त कोरोनाचेच रुग्ण आहेत का? इतर रुग्णांचे काय? खास करून जे हृदय रोगी आहेत ज्यांची बायपास सर्जरी किंवा एन्जोप्लास्टी झाली आहे त्यांना चेकअप साठी रुग्णालयात जावे लागते. पण रिक्षा, टॅक्सी आणि बसेस बंद आहेत. त्यातच भीतीपोटी खाजगी डॉक्टरांनी सुद्धा आपले दवाखाने बंद करून ठेवले आहेत अशावेळी या रुग्णांनी काय करायचे घरातच तडफडून मरायचे का? काही किडनीचे पेशंट आहेत त्यांना डायलिसिस करावे लागते त्यांनी घराबाहेर कसे पडायचे? काही वृध्द व्यक्ती आहेत ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा यासारखे विकार असून आठवड्यातून किमान दोन वेळा तरी डॉकटरकडे जावे लागते त्यांनी काय करावे? म्हणजे ज्या गोष्टी प्राधान्याने सुरू करायला हव्यात त्या सुरू करायच्या सोडून दारूची दुकाने सुरू केल्याने सरकार नशेत आहे का असा सवाल करावासा वाटतो.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम