
परप्रांतीयांची घरवापसीसाठी भागमभाग.नगर परिषद कार्यालय,पोलीस स्टेशन परिसरात गर्दी
- by Rameshwar Gawai
- May 04, 2020
- 1763 views
बदलापूर : लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेले परराज्यातील मजूर, कामगार आणि विद्यार्थ्यांना परत त्यांच्या गावी पाठवण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी आतूर झालेल्या या नागरिकांनी यासाठीचे अर्ज मिळवण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषद कार्यालय व पोलीस स्टेशन परिसरात मोठी गर्दी केली होती.
लॉकडाऊनमुळे आपल्या मुळ गावी न जाऊ शकलेल्या परप्रांतीय कामगार आणि मजुरांना गावी जाण्यास मंजुरी देण्याची घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयाने केल्यानंतर काल सकाळपासून यासाठीचे अर्ज मिळवण्यासाठी परप्रांतीयांची धावाधाव सुरू आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने याबाबतचा एक अर्ज सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला होता. तसेच यासंदर्भात नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते.नगर परिषदेच्या सुरक्षा रक्षक कार्यालयातुन हे अर्ज मोफत उपलब्ध करून देण्यात येत होते. त्यामुळे हे अर्ज मिळवण्यासाठी काल सकाळपासून परप्रांतीयांनी मोठी गर्दी केली होती. या लोकांना रांगेत उभे करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर नगर परिषदेने हे अर्ज देण्याचे बंद करून याबाबत पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे अर्जासाठी परप्रांतीय पोलीस स्टेशनकडे जाऊ लागल्याने पोलीस स्टेशन परिसरातही गर्दी होऊ लागली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना परत पाठवून एकत्र न येता गटागटाने येण्याचे आवाहन केले.
तीन ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेमार्फत परप्रांतीय कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी तीन ठिकाणी तपासणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.बदलापूर पश्चिमेकडील भाजी मार्केट येथील टाऊन हॉल येथे तर बदलापूर पूर्वेकडील कात्रप येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच कात्रप येथे बँक ऑफ बडोदा शेजारी असलेल्या आधार केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य तपासणी सकाळी दहा ते पाच या वेळात करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्याचा अहवाल घेऊन पोलीस स्टेशनला अहवाल सादर करावयाचा आहे. तेथून हा अहवाल नोडल अधिकारी असलेले पोलीस उपायुक्त कार्यालयाकडे स्थानिक पोलिस स्टेशन मार्फत देण्यात येणार आहे. त्यानंतरच या परप्रांतीय मजूर आणि कामगारांना गावाकडे जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम