कराडात दोन, जावलीत एकाला कोरोना

● बाबरमाची-चरेगाव पुर्णतः सील

● बाधितांची नागपुर-पुणे प्रवासाची हिस्ट्री

● कुटूंबातील चौथ्याला कोरोना, 

● जिल्हय़ाला पुन्हा धक्का 


सातारा: (अॅड  भास्कर करंदकर) कोरोनाच्या महामारीत सातारा जिल्हय़ाची अवस्था भाव भावनांच्या हिंदोळय़ावर अक्षरशः झुलते आहे.

कधी आनंद गळय़ापर्यंत येतोय तर कधी गळा घोटल्या सारखं होतंय.

तोच जिल्हय़ात तिघे कोरोना बाधित निघाले. शनिवारी दोघे कोरोना मुक्त झाल्याने धीर येत असतानाच कराड नजीकच्या दोघांना व जावलीच्या  एकाला कोरोना झाल्याने संपुर्ण सातारा जिल्हय़ाला पुन्हा धक्का बसला. 

ओगलेवाडी जवळची बाबरमाची व उंब्रज-पाटण रस्त्यावरील चरेगाव पुर्णतः सील केले असून प्रशासनाने दोन्ही गावांच्या परिसराचा ताबा घेतला आहे. बाबरमाचीचा 35 वर्षीय युवक एका रूग्णालयाशी निगडीत असून त्याने नागपुर-पुणे विमानाने तर पुणे-कराड कारने प्रवास केल्याचे सांगितले जात आहे.

तर चरेगावचा 30  वर्षीय युवक पुण्याहून गेल्या महिन्यातच आला होता. विशेष म्हणजे कराडच्या या  दोन्ही युवकांनी काळजी व कर्तव्य पार पाडत होम क्वॉरंटिन झाले होते. पण कोरोनाच्या बाधेने त्यांचा पाठलाग केलाच. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हय़ातील बाधितांचा आकडा तेरावर पोहोचला.

दरम्यान, रविवारी कोरोनामुक्त झालेल्या निझरे ता. जावलीच्या व्यक्तीला अत्यंत आनंदाच्या वातावरणांत सातारा जिल्हा रूग्णालयातून घरी निरोप देण्यात आल. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर स्वतः उपस्थित होते मात्र त्यांनी आरोग्यकर्मीच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ दिला. 

टाळय़ांच्या गजराने जिल्हा रूग्णालय दणाणून गेले. या टाळय़ा वाजत असतानाच त्यांच्यामागे लपलेले मोठे दुःख रात्री उशिरा येऊन धडकले. कोरोनामुक्त झालेल्या या व्यक्तीच्या कुटूंबातील चौथ्या व्यक्तीला कोरोना झाल्याचा धक्कादायक अहवाल साताऱयात धडकला. एकाच कुटूंबातील ही चौथी व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून विलगीकरणांत होती. त्यांचा पाचव्या दिवसाचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी शनिवारी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जावली तालुक्यात आढळून आलेल्या एकाने तीघांना पॉझिटिव्ह केले असले तरी तो स्वतः कोरोनामुक्त झाला आहे.

कराडला पुन्हा एकदा जोरदार झटका

कोरोनाच्या युद्धात सातारा जिल्हय़ातील कराड तालुक्यालाच पुन्हा एकदा झटका बसला आहे. एकटय़ा कराड तालुक्यातील बाधितांचा आकडा 6 झाला असून त्यातील एकाचा मृत्यू व एक मुक्त झाल्याने सध्या ऍक्टीव्ह 4 जणच असले तरी शासन दरबारी 6 हाच आकडा धरला जातो. 

शनिवारी कोरोनामुक्तीचा आनंद झाला पण तो साजरा करावा की नको अशी धास्ती असतानाच दुसऱयाच दिवशी दोघांना कोरोना झाल्याने कराडकरांचे काळीज पिळवटून निघते आहे.

बाबरमाचीच्या युवकाने घेतली होती काळजी....

ओगलेवाडीनजीकच्या बाबरमाची मध्ये आढळलेला युवक कराडातील एका रूग्णालयाच्या कर्मचारी आहे. त्याचा संदर्भ नागपुर प्रवासाशी आहे. कामा निमित्त हा युवक नागपुरहून 24 मार्चला विमानाने पुण्यात आला व पुण्याहून कारने गावी पोहोचला.

शासनाच्या नियमाप्रमाणे त्याने त्याची कल्पना दुसऱयाच दिवशी ओगलेवाडी आरोग्यकेंद्रात दिल्याने त्या होम क्वॉरंटिनचा सल्ला देण्यात आला. 13 एप्रिलला त्रास जाणवू लागल्याने त्याने स्थानिक खाजगी डॉक्टरला दाखवले होते पण त्रास वाढल्याने त्याचा शनिवारी घश्यातील स्त्राव तपासणीसाठी पाठवले व रविवारी तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

याच्या अती संपर्कातील व ज्या खाजगी डॉक्टरला दाखवले तो व त्यांची महिला साहाय्यक यांच्यासह 8 जणांना तातडीने विलगीकरणांत घेण्यात आले आहे. रेल्वेस्टेशन व बाबरमाची या सदाशिवगडच्या परिसरांत गेल्या 5 दिवसांत 2 रूग्ण आढळून आल्याने परिसरांत प्रचंड घबराहट निर्माण झाली असली तरी कोणीही घाबरून न जाता योग्य ती काळजी घेत शासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलंय.

चरेगावच्या युवकाला होता होम क्वॉरंटिनचा सल्ला

कराड तालुक्यातील चरेगावचा युवक निगडी-पुणे येथील एका कंपनीत नोकरीस होता. 26 मार्च रोजी तो पुण्यातून .......... ने आपल्या चरेगावांत पोहोचला. तोवर शासनाने प्रवास करून आलेल्यांची माहिती देण्याची सुचना केली होती. त्याप्रमाणे त्यानेही उंब्रज आरोग्यकेंद्रात तपासणी करून घेतली. त्याला लक्षणे नव्हती तरी त्याला होम क्वॉरंटिनचा सल्ला देण्यात आला. गुरूवारी 16 एप्रिलला त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला व तोही पॉझिटिव्ह असल्याचे कळले आहे.

चरेगावसाठी हा मोठ्ठा धक्का आहे. अनेक कारणांनी लौकीक असलेल्या गावावर आलेले आरिष्ठ पसरू नये म्हणून गावचा रस्ता जेसीबीने आडवा चर काढून रातोरात पुरता बंद केला आहे. सगळं गाव सीलबंद ठेवण्यात आले असून प्रशासनाने पंचक्रोशीच ताब्यात घेतलीय.

विवारी 55 जण निगेटिव्ह तर एकही नव्याने दाखल नाही

कोरोना महामारीचे हिंदोळेच सुरू आहेत. रविवारी जिल्हय़ातील 55 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. यात सातारा-18, कृष्णा-17, कराड उपजिल्हा रूग्णालय-7, फलटण-11, कोरेगाव-1 तर वाई-1 असे होय. विशेष म्हणजे शनिवारी रात्री सातारा जिल्हा रूग्णालयांत तिघांना विलगीकरणांत दाखल केले असले तरी रविवारच्या दिवशी जिल्हय़ातील सहा कोरोना सेंटर पैकी एकाही ठिकाणी एकालाही विलगीकरणांत दाखल केले नाही. मात्र, याच दिवशी जिल्हय़ात 2 जण बाधित असल्याचा अहवाल आलाय.

केवळ 28 अहवाल प्रलंबित होते पण आता संख्या वाढेल.....

जिल्हय़ात रोज कित्येक जण दाखल होत आहेत व त्यातील काहींचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले जातात. अहवाल पाठवले की ते निगेटिव्ह येई पर्यंत जीव टांगणीला असतो. रविवारी केवळ 28च अहवाल प्रलंबित होते. पण आता बाधित आलेल्या दोघांच्या संपर्कातील कित्येकांचे स्त्राव घेऊन तपासणीला पाठवून त्यांची तपासणी निगेटिव्ह यावी याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

जिल्हावासियांनो लक्षांत घ्या.... की

14 दिवस उलटूनही दोघे पॉझिटिव्ह, का? कसे?

बाधित आढळलेल्या कराडच्या दोन्ही युवकांनी आरोग्य खात्याला कळवणे, शक्य ती काळजी घेणे असे केले होते. तरी तेच दोघे बाधित झाले. म्हणजेच नंतर काळजी घेण्यापेक्षा आधिच संपुर्ण दक्षता घेण्याशिवाय काहीच पर्याय नाही. दरम्यान, बाबरमाची युवक नागपुर-पुणे प्रवास करून 25 दिवस झालेत तर चरेगावच्या युवकाला पुण्यातून येऊन 23 दिवस झालेत त्यानंतर त्यांचे स्वॅब पाठवण्यात आले व ते पॉझिटिव्ह आढळले. म्हणजेच कोरोनाचे संकट आता हळूहळू कमी होत आहे असा समज करून जे बाहेर पडायला लागले आहेत त्यांनी आत्ताच आपल्या कुटूंब, गल्ली कॉलनी व गाव-तालुक्याला कोरोना पासून वेगळं ठेवण्यासाठी घर बंद राहणं आवश्यक आहे.



रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट