कराडकरांचा डंका, आज जावलीच्या टाळय़ा

● कोरोनायुद्धात सातारा जिल्हय़ाचे मोठे यश, 

● कराडचा युवक कोरोनामुक्तीनंतर घरी

● जावलीतील व्यक्तीही कोरोनामुक्त

● जिल्हय़ात सलग दोन दिवस दोघे झाले मुक्त

● ‘कृष्णा’ला आनंदाचे उधाण

सातारा,:(अॅड.भास्कर करंदकर) कोरोनाशी झुंज देणारे खरे सरदार-डॉक्टर्स एका रेषेत टाळय़ा वाजवत होते.... 

तमाम आरोग्यकर्मी त्यांच्या मागे जणू त्याला सॅल्युट ठोकून उभे होते....

आणि तो योद्धा विजयाची पताका घेऊन एकेक पाऊल टाकत सरसेनापतींच्या रूबाबात पुढे चालला होता.....! 

होय, हे कराडच्या कृष्णा रूग्णालयाच्या कोरोना रणांगणातलं शनिवारचं चित्र आहे. शेकडो क्रांतींना जन्म देणाऱया या जिल्हय़ाच्या भूमीत अजून एक क्रांतीचा झेंडा रोवला जातोय.

मुंबईतून कोरोना घेऊन कराडच्या तांबव्यात आलेल्या 35 वर्षीय युवकाने शनिवारी कोरोनाच्या युद्धात मुक्तीचा झेंडा रोवला. 15 दिवसांच्या उपचारानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. जगाला हादरून सोडणाऱया या जागतीक युद्धात शनिवारचा दिवस हा कराडकरांच्या टाळय़ांचा होता.

दरम्यान, शनिवारचा दिवस हा बुधवारची धडकी विसरायला लावणारा ठरला कारण एक युवक कोरोनामुक्त होऊन घरी पोहोचला होता त्याचवेळी निझरे ता. जावली येथील 54वर्षीय व्यक्तीचे 14 व 15 व्या दिवसांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यालाही कोरोनामुक्त म्हणून घोषीत करण्यात आले असून त्यांना रविवारी घरी सोडण्यात येणार आहे.

अवघ्या काही दिवसांत सातारा जिल्हय़ातील कोरोनाबाधितांचा आकडा 11 वर गेला त्यात दोघांचे बळी गेले असले तरी हा लढा तमाम जिल्हावासीय आपल्या प्रचंड संयमाच्या जोरावर नक्की जिंकतील असा आत्मविश्वास निर्माण होण्याची जागा आहे. 

कोपरखैरणे मुंबई येथे जहाजावर काम करणारा युवक कोरोना घेऊनच तांबवे ता. कराड येथे दाखल झाला. त्याच्या बाधित होण्याने सारा जिल्हय़ात खळबळ, तालुक्यात घबराहट तर आख्खं गाव सील झालं होतं. तेंव्हाच त्याचं अवघ्या एका बिछान्याभोवती युद्ध सुरू झालं होतं. एकेक क्षण जीवावरून जात असतो अशा पंधरा दिवसांनंतर त्याचा अहवाल शनिवारी निगेटिव्ह आला.

खरंतर तो अहवाल केवळ एक कागद नव्हता तर दुःखात गेलेल्या साऱया लोकांच्या आशा पल्लवीत करणारा एक धुमारा होता. तो एक कागद नव्हता तर अहोरात्र झटणाऱया डॉक्टर्स, आरोग्यकर्मींच्या पाठीवर शाब्बसकी होती आणि प्रशासनाच्या अथक कामाची पोहोच पावती होती.

हा युवक आपल्या कोरोनावॉर्डमधून बाहेर पडल्या पासून पॅसेजमधून चालत बसमध्ये बसे पर्यंत झालेला टाळय़ांचा कडकडाट या साऱयाचा साक्षीदार बनून राहिला. युवक बाहेर पडला तेंव्हा कृष्णाचे डॉ. सुरेश भोसले, डीन डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांनी त्याला पुष्पगुच्छ दिला.

जिल्हय़ातली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषद सीईओ संजय भागवत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरूद्ध आठल्ये यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचे अथक प्रयत्न सुरू आहेत.

जावलीच्या वाघाने दिली कोरोनाला धडक

तांबव्याचा युवक घरी पोहोचला असेल तोच जिल्हय़ातील कोरोनाशी झुंज देणाऱया समस्त आरोग्यकर्मीच्या आनंदाला उधाण आले. ......मुंबईतून आलेला व मुळचा निझरे ता. जावली येथील 54 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे गावाकडे आल्यावर समजले. यामुळे साऱया जावली खोऱयात जणू धरणीकंप झाला. निझऱयासह पंचक्रोशी सील करण्यात आली. मात्र हीच ती व्यक्तीचे शुक्रवारी 14 दिवस होत होते त्या दिवसांसह शनिवारच्या 15व्या दिवसांचा अहवालही निगेटिव्ह आल्याने सगळे जिल्हा प्रशासन आनंदून गेले.

जरी कोरोनामुक्त झाला तरी....

आनंद त्रिगुणीत करून साजरा व्हावा

सदर व्यक्ती ही कोरोनामुक्त झाली असली तरी या आनंदाला मर्यादा पडल्या आहेत. खरेतर जावलीतला हा आनंद रविवारी साजरा होईलच पण तो केवळ द्विगुणीत नव्हे तर त्रिगुणीत व्हायला पाहिजे यासाठी पुन्हा एकदा सातारकरांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत. कोण प्रार्थना करतंय, कोण दुवा मागतंय तर कोण मन्नत मागत आहे. कारण याच व्यक्तीच्या अतीसंपर्कात आलेल्या त्यांच्याच दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. येत्या काही दिवसांत त्यांचेही असेच निगेटिव्हचे अहवाल यावेत आणि जावलीसह जिल्हय़ाचा आनंद त्रिगुणीत व्हावा, हीच साऱयांची अपेक्षा आहे.

सदर व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी त्यांना रविवारीच घरी सोडण्यात येणार आहे. जावलीच्या अतीदुर्गम खेडय़ात राहणाऱया या व्यक्तीचा हा लढा अक्षरशः थक्क करून सोडणारा आहे.

जिल्हयात एकाच दिवशी 143 जणांचे अहवाल निगेटिव्ह

शनिवारी एक कोरोनामुक्त होऊन घरी, आणखी एकजण कोरोनामुक्त अशा दोन सुखद घटना घडल्या असतानाच शनिवारने अजून एक विक्रम केला तो म्हणजे एकाच दिवशी जिल्हय़ातील 143 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यात 

साताराः 16, 

कृष्णा कराडः 79, 

कराड उपजिल्हा रूग्णालयः 27, कोरेगावः 6 

तर फलटणमधील 24 जणांचा सहभाग आहे.

दरम्यान, शनिवारी एकुण 19 जणांना विलगीकरण कक्षांत ठेवले आहे त्यात साताऱयात तिघे, वाईत एकजण तर फलटणांत 15 जणांना विलगीकरण कक्षांत हलवले आहे.


मला पुर्ण जिल्हा कोरोनामुक्त करायचा आहे’

कोरोनाचा हा लढा सुरू आहे. यात मिळत असलेले यश हे आरोग्ययंत्रणेचे आहे. त्यांना सर्वच यंत्रणा उत्तम सहकार्य करत आहेत. एकुण आढळून आलेल्या 11 पैकी चौघे पुर्णतः कोरोनामुक्त झाले असले तरी हे युद्ध संपले नाही. हे त्यातले आनंदाचे काही क्षण आहेत ते आमची उम्मीद वाढवत असून ‘संपुर्ण सातारा जिल्हा कोरोनामुक्त’ हे माझे अंतिम उद्दिष्ठ आहे. कोरोनाबाधित असलेले किंवा अनुमानित झालेले लोक ज्या प्रमाणे प्रशासनाला सहकार्य करत आहेत त्याच पद्धतीने सर्व जनतेने सुचनांचे तंतोतंत पालन केले तर कोरोनामुक्त जिल्हय़ाचे माझे स्वप्न दूर नाही.

शेखर सिंह

जिल्हाधिकारी, सातारा.

1. सातारा जिल्हा रुग्णालय 363

2. कृष्णा कराड - 276

3. एकूण दाखल - 639*

4. 14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 9

5. घेतलेले नमुने एकूण- 648

6 कोरोना बाधित अहवाल - 11

7 कोरोनामुक्त 4

8 एकूण निगेटीव्ह अहवाल - 556

9 अहवाल प्रलंबित - 72

10 डिस्चार्ज दिलेले- 558

11. मृत्यू 2


 


.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट