
ठिणगी
हाताला काम नाही खिशात दाम नाही रिकाम्या पोटान लढायला सांगता सरकारच्या धोरणात जराही राम नाही!
- by Adarsh Maharashtra
- Apr 16, 2020
- 1417 views
कोरोना विरूद्ध जे लढायला सांगत आहेत त्यांनी या वरच्या चार ओळी वाचून गोरगरीब जनतेच्या आजच्या भयंकर वाईट अवस्थेच वास्तव समजून घ्यावं! भरल्या पोटावर उपदेश करायला आणि सल्ले द्यायला काय जातंय! पण आज लॉक डाऊन मुळे ग्राउंड लेव्हलवर काय परिस्थिती आहे ते अगोदर सरकारने आणि उपदेश करणाऱ्यांनी समजून घ्यायला हवे होते. मंगळवारी बांद्रयात जे काही घडल ते चुकीचं होत की बरोबर होत यावर चर्चा करण्यापेक्षा लोकांच्या उद्रेकाची ती एक ठिणगी होती. भविष्यात इतर ठिकाणीही अशा घटना घडू शकतात ही वस्तुस्थिती अजूनही ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांना भविष्यातल्या संकटांची कदाचित कल्पना नसेल. कोरोना या देशात कोणामुळे आणि कसा आला हा एक स्वतंत्र चर्चेचा आणि चौकशीचा विषय आहे पण कोरोनाच्या भीतीने जे लॉक डाऊन केले जात आहे तेही कोरोना इतकचं धोकादायक ठरणार आहे कारण ज्यांच्याकडे पैसा आहे, सोईसुविधा आहेत त्यांना लॉक डाऊनचा फारसा फरक पडणार नाही पण ज्यांच हातावर पोट आहे. रोज कमवायचे आणि रोज खायचे ज्यांच्याकडे डोक्यावर छप्पर नाही आणि कायमस्वरूपी घरदार नसल्यामुळे ज्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड यासारखे नागरिकत्वाचे सरकारी पुरावे मिळू शकले नाहीत अशा लोकांची आज खूप वाईट अवस्था आहे. रेशनकार्ड नसल्यामुळे मोफत धान्य योजनेतील धान्य मिळत नाही आणि हातात पैसा नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तूही मिळत नाहीत. बरे लॉक डाऊन जाहीर करण्यापूर्वी अशा लोकांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची तरी सरकारने व्यवस्था करायला हवी होती पण तीही केलेली नाही त्यामुळे पर राज्यातले हजारो मजूर आज मुंबई पुण्यासारख्या मोठ्या महानगरांमध्ये अडकून पडलेत. सरकार किती जरी सांगत असले की त्यांच्या खाण्यापाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे त्यामुळे इथे उपाशी मरण्यापेक्षा आपल्या गावी जाऊन मेलेल बरं या हेतूने परराज्यातील गरीब मजुरांना त्यांच्या गावची ओढ लागली आहे अशावेळी २१ दिवसांचा लॉक डाऊन पूर्ण झाल्यानंतर कोणीतरी रेल्वे सुरू झाल्याची अफवा पसरवली आणि लोकांनी बांद्रा रेल्वे स्थानकाबाहेर हजारोंच्या संख्येने गर्दी केली. ज्यांनी कुणी अशी अफवा पसरवली त्याच्यावर यथावकाश कारवाई होईलच पण या निमित्ताने शहरी भागात अडकून पडलेल्या आणि अनेक समस्यांचा सामना करणाऱ्या मजुरांच्या संतापाचा उद्रेक बघायला मिळाला आणि हा उद्रेक केवळ मुंबईतच झाला नाही तर मोदींच्या सुरत मध्येही असाच उद्रेक झाला पण गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना केंद्राने जाब विचारला नाही पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मात्र गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करून वांद्रयातील त्या घटनेबाबत चिंता व्यक्त केली म्हणजे संकटाच्या काळात सुद्धा भाजपवाल्यांचे कसे राजकारण सुरू आहे ते बघा! वास्तविक अशा कठीण काळात कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता मंगळवारी बांद्रा आणि सुरत मध्ये घडलेल्या घटनांबाबत आत्मचिंतन करावे. लॉक डाऊनला सरसकट मुदतवाढ दिल्याने लोकांचा आणि खास करून ज्यांच्या पोटापाण्याची काहीही व्यवस्था नाही अशा लोकांचा संयम का सुटतो त्याचा विचार करावा कारण कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊनचे दुष्परिणाम आज ज्या वर्गाला भोगावे लागत आहे त्याच्या समोर आणखी एक मोठं संकट आहे ते म्हणजे देशांतर्गत आर्थिक मंदीचे कारण कारण लॉक डाऊन मुळे दरदिवशी ३५ हजार कोटींचे नुकसान होते २१ दिवसांच्या लॉक डाऊन मुळे देशाचे ८ लाख कोटींचे नुकसान झाले आहे आणि त्यानंतर वाढविलेल्या १९ दिवसांच्या लॉक डाऊन मुळे आणखी किती नुकसान होईल याची कल्पना नाही या नुकसानीत बळी जाणार आहे तो छोट्या उद्योगांचा आणि त्यावर विसंबून असलेल्या कोट्यवधी गरीब कामगारांचा! एका आर्थिक सर्वेक्षणानुसार ३ मे नंतर भारताचा जीडीपी शून्यावर आलेला असेल अशा स्थितीत बँकांची कर्ज देण्याची क्षमता ही संपलेली असेल त्यामुळे बँकांकडून मिळणाऱ्या कर्जावर तग धरून असलेले छोट उद्योग बंद पडतील आणि भयंकर बेरोजगारी वाढेल. बेरोजगार झालेले लोक जगण्यासाठी गुन्हेगारीकडे वळतील आणि त्यानंतर देशात काय परिस्थिती निर्माण होईल याची कल्पनाही करवत नाही. कोरोनाच्या भीतीने सारखे सारखे लॉक डाऊन करणे म्हणजे हाताला जखम झाल्यानंतर संपूर्ण हात तोडण्यासारखे आहे पण सत्तेतल्या अती शहाण्या लोकांना हे सांगेल कोण? पण एक मात्र खरे की जेंव्हा जेंव्हा एखादे संकट येते तेंव्हा तेंव्हा त्या संकटात सर्वात प्रथम गोरगरीब जनतेचा बळी जातो. आताही कोरोनाच्या या संकटात गोरगरीब माणसावर उपासमारीची पाळी आल्याने त्याच्या मनात असंतोष आहे आणि मंगळवारी बांद्रा आणि सुरत मध्ये याच असंतोषाचा उद्रेक झाला मात्र ती एक ठिणगी होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण लोक अधिक काळ लॉक डाऊनचा हा बंदीवास सहन करू शकत नाहीत आणि हीच बाब सरकारने सुद्धा समजून घ्यायला हवी.
भूक माणसाला फार काळ स्वस्थ बसू देत नाही आणि लॉक डाऊन मुळे तर आज लाखो लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे त्यामुळे माणूस किती काळ संयम राखणार? कोरोना झपाट्याने पसरतो आहे हे जरी खरे असले तरी लॉक डाऊन मुळे त्याला आळा घालण्यात यश आलेले नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे. आजदेशातील कोरोना बधितांची संख्या १० हजारांच्या पुढे गेलेली आहे आणि ती वाढतच आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत पण त्याच बरोबर महाराष्ट्रातील १० जिल्हे असेही आहेत की जिथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही तिथे काही २२ मार्च पूर्वी लॉक डाऊन नव्हते. मात्र जे लोक बाहेरच्या देशातून कोरोना बाधित होऊन आले ते सुदैवाने या १० जिल्ह्यांमध्ये पोहचले नाहीत म्हणून हे जिल्हे कोरोनामुक्त राहिले याचाच अर्थ कोरोनाची चीन मार्फत जेंव्हा चाहूल लागली तेंव्हाच आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करायला हवी होती पण जगात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असतानाही बाहेरच्या देशातून आमच्या देशात लोक येत होते आणि ज्या इटलीत कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले तिथले लोकही भारतात आले होते होते त्यामुळे कोरोना बाबत भारत सरकारचे चुकीचे धोरणच कोरोनाच्या प्रादुर्भाव कारणीभूत असून त्याचे दुष्परिणाम मात्र इथल्या नागरिकांना खास करून गोरगरिबांना भोगावे लागत आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम