पाेरांच्या करामतींमुळे गावागावांत "थरथराट' चित्रपटाच्या आठवणींना मिळू लागला उजाऴा
- by Adarsh Maharashtra
- Apr 12, 2020
- 702 views
कोरोनामुळे "लॉकडाउन'मध्ये केशकर्तनालये बंद झाल्याचा फटका लहान मुले व प्रोढ व्यक्तींनी चांगला बसला आहे. दररोज "सेल्फी' काढून "डीपी'ही ठेवता येईना. सर्वांच्याच डोक्यावर केसांचे जणू डालगे तयार झाले. यावर चांगला उपाय काढत लहान मुलांपासून ते प्रोढ व्यक्तींनी घरच्या घरी "ट्रिमर'ने डोक्याचा टक्कल करत घरातच "टकलू हैवानाची गॅंग' तयार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे "थरथराट' या मराठी चित्रपटाची आठवण अनेकांना होऊन गेली.
आज कोरोनाचे नवीन रुग्ण किती मिळाले? याबरोबर आज किती नवीन टकले झाले, यावरही "व्हॉट्सऍप'च्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येऊ लागले.सर्व पार्लर्स व सलून बंद असल्याने गनिमी काव्याने मागच्या दाराने, खिडकीतून, गच्चीवरून अशी "ट्रिमर'ची देवाणघेवाण सुरू झाली. बघता बघता हा आकडा कोरोनाइतक्याच वेगाने वाढत चाललेला आहे. कोणी "फॅशन' म्हणून तर कोणी नाईलाजास्तव टक्कल करताना दिसून येत आहेत.
दर वर्षी यावेळी शाळेच्या परीक्षा संपून सुट्या सुरू होण्याचे दिवस. शाळेला सुटी लागली, की इतरवेळी शाळेत गुंतलेली वानरसेना चौफेर उधळत पालकांच्या नाकीनऊ आणते. उन्हातान्हात खेळून झाल्यावर सायंकाळी मुलांना शोधून घरी आणावे लागते; पण या वेळी उलटे झाले आहे. ही वानरसेना घरात "क्वारंटाइन' झाली आणि पालकांचे "बीपी' वाढायला सुरुवात झाली. दोन ते चार दिवस गेल्यावर मुलांनी घरातच आपल्या उपद्रवक्षमतेला वाव दिला आणि पालकांचे जीव कासावीस व्हायला लागले. शाळा आणि बाहेर खेळण्यासाठी असणारी मैदाने यांचे महत्त्व एकाएकी कमालीचे वाढले. दिवस जातील तसे मुलांचे उपद्रवमूल्यही वाढू लागले आणि त्यांनी चार भिंतीच्या आतून ऑनलाइन करामती सुरू केल्या. हे आधुनिक "टकलू हैवान' आजही नवनवीन करामती करून पालकांना मेटाकुटीस आणत आहेत आणि टकलू हैवानाची टोळी गावात दाखल झाल्याच्या घटनेला पुन्हा नवीन रीतीने उजाळा मिळत आहे आणि पालकांचा अंगाचा पुन्हा एकदा थरथराट होत आहे.घरी बसून करामती करताना एकाने "ट्रिमर' कसे चालवायचे याचे प्रात्यक्षिक दुसऱ्याच्या डोक्यावर करत असताना चुकून एक टवका निघाल्याने त्याला टक्कल करणे भाग पडले आणि मग त्याला मानसिक आधाराची गरज आहे हे ओळखून दुसऱ्यानेही आपल्या केसाला तिलांजली दिली. ही गोष्ट शेजारच्या भावाच्या घरात कळल्यावर या मूळ दोन टकल्यांनी आणखी एकाचा समावेश आपल्या पंथात करून घेतला. असे करत करत अवघ्या काही तासांत ही साथ कोरोनापेक्षा वेगाने पसरली. आज, उद्या करत करत एक-एक टकले वाढायला लागले. आज गोंदवल्यातील मुस्लिम समाजातील घरांमध्ये टकल्यांची संख्या तब्बल 17 झाली आहे अशी माहिती गोंदवले बुद्रुक येथील डॉ. समीर तांबोळी यांनी दिली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम