पत्रकारितेतील रोखठोक आदर्श

वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याच बरोबर तो जनमानसाचा आरसाही आहे कारण समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींचे त्यात स्वच्छ असे प्रतिबिंब दिसत असते. दैनिक आदर्श महाराष्ट्रने गेली ९ वर्ष या आरशाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेत समाजातील बऱ्या वाईट गोष्टी लोकांसमोर ठेवल्या आणि लोकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्या मागील ९ वर्षाच्या यशस्वी वाटचालीत आदर्श महाराष्ट्रने चांगल्या गोष्टींची नेहमीच प्रशंसा करून त्यांना ठळकपणे प्रसिध्दी दिली, तर ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्यांच्यावर शब्दांचे आसूड ओढताना कुणाचाही मुलाहिजा बाळगला नाही, म्हणून तर सर्वसामान्य गरीब, कामगार, शेतकरी, फेरीवाला, रिक्षा किंवा टॅक्सीवाला मोठ्या विश्वासाने त्यांच्या समस्या घेऊन आदर्श महाराष्ट्रच्या कार्यालयात येतात आणि आदर्श महाराष्ट्रनेही ठळकपणे त्यांच्या समस्यांना वाचा फोडून त्या सरकारी दरबारी मांडल्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाचकांमध्ये आदर्श महाराष्ट्र विषयी एक विश्वासाची भावना निर्माण झाली आहे आणि वाचकांचा हा विश्वास हेच आदर्श महाराष्ट्रचे मोठे भांडवल आहे आणि याच भांडवलावर गेली ९ वर्ष आमची वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागले पण या सर्व अडचणींवर मात करून आदर्श महाराष्ट्रने दहाव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. अडचणी कोणाला नसतात? या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला अडचणी येतात पण त्यावर मात करून अडचणींचा सामना करून जो जिद्दीने आपले कार्य चालू ठेवतो त्याच्यासाठी यशाचे शिखर फार दूर नसते. आदर्श महाराष्ट्रही याच जिद्दीने प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत भक्कमपणे पाय रोवून उभा आहे. आज जिथे एक साप्ताहिक चालवणे कठीण आहे तिथे दैनिकासमोर किती अडचणी असू शकतात याची कल्पना करा. कागदाचे वाढलेले दर, छपाईचा प्रचंड खर्च, याशिवाय कार्यालयीन कामकाजासाठी लागणारा निधी या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ बसवताना फार मोठी कसरत करावी लागते. जे मोठे उद्योगपती या क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी पेपर चालवणे किंवा त्यासाठी लागणारी मोठी यंत्रणा सांभाळणे फारसे कठीण नाही. पण जी छोटी वृत्तपत्र आहेत त्यांच्यासाठी हे क्षेत्र दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. कारण इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा वृत्तपत्रांच्या खपावर परिणाम झाला आहे. त्यातच मंदीमुळे जाहिरातींवर मर्यादा आली आहे आणि मुख्य म्हणजे छोट्या वृत्तपत्रांना वितरकांकढून हवे तसे सहकार्य मिळत नाही. या आणि अशा कितीतरी अडचणींचा सामना करीत आदर्श महाराष्ट्रने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. वास्तविक वृत्तपत्र म्हटल की त्याची कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी असता नये तरच निर्भिडपणे कुणाच्याही विरोधात लिहिता येते. अगदी सरकार जर काही चुकीचे करीत असेल तर सरकारच्या विरोधातही आवाज उठवता येतो. आदर्श महाराष्ट्रने हेच केले. सत्ता कुठल्याही पक्षाची असो त्यांनी जर काही चुकीचे केले तर त्याविरुद्ध आवाज उठवताना पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांची सुद्धा तमा बाळगली नाही. त्यांच्याही विरोधात निर्भिडपणे बातम्या छापल्या. अग्रलेखातून त्यांचा समाचार घेतला. जर आमची कुठल्या राजकीय पक्षाशी अथवा पुढाऱ्यांशी आर्थिक बांधिलकी असती तर आम्हाला एवढं धाडस करता आले नसते. सरकारी कर्मचाऱ्यांची मुजोरी आणि भ्रष्टाचार याविरुद्ध तर आदर्श महाराष्ट्रने मोहीमच उघडली होती. मुंबईत अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचां जाहीरपणे पंचनामा करताना भूमाफिया आणि पालिका अधिकारी यांचे कसे साटेलोटे आहेत हे वेळोवेळी लोकांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर काही अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली तर अशा बांधकामांना आणि भूमाफिया पाठीशी घालणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना त्यांच्या बेकायदेशीर कृत्याची बदली अथवा निलंबनाच्या रूपाने किंमतही मोजावी लागली. सर्वसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडताना वेळप्रसंगी सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करावा लागतो आणि त्यासाठी हिम्मत असावी लागते जी आदर्श महाराष्ट्रने गेल्या ९ वर्षात दाखवून दिली. आणि हे सगळ करत असताना आमच्या या पत्रकारितेचा व्यवसायात घुसखोरी करून लोकांना लुबाडणाऱ्या भुरट्या आणि बोगस पत्रकारांनाही आम्ही सोडले नाही, त्यांचेही कपडे उतरवले. आजपर्यंत कुठल्याही वृत्तपत्राने असे धाडस केले नव्हते पण आदर्श महाराष्ट्र समोर स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर,आगरकर,आचार्य अत्रे, ह.र.महाजनी यांच्यासारख्या समाजसुधारक थोर पत्रकारांचा आदर्श आहे. त्यामुळे या व्यवसायातील भुरट्यांना जसे आम्ही घाबरलो नाही तसेच मालकांच्या ताटाखालचे मांजर बनून आर्थिक तडजोडीची पत्रकारिता करूनही बड्या वृत्तपत्रांचे बडे पत्रकार म्हणून कधीही मिरवलं नाही.  मुख्य म्हणजे पत्रकारांच्या कल्याणाच्या नावाखाली पत्रकारांच्या संघटना काढून त्या संघटनेच्या नावाखाली भुरट्यांना आश्रय देण्याच्या पापात आम्ही कधीही सहभागी झालो नाही आणि हीच आमची वेगळी ओळख आहे. म्हणूनच आमच्या ज्या हजारो वाचकांनी, हितचिंतकांनी आणि जाहिरातदार मंडळींनी आजवर जसे खंबीरपणे आमच्या पाठीशी राहून आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद! आणि आपलं स्नेह व प्रेम आमच्या पुढील वाटचालीत सुद्धा असेच सदैव राहील हीच अपेक्षा!

रिपोर्टर

  • Editor
    Editor

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट