
डोंबाऱ्याचा खेळ
आर्थिक, सामाजिक, बौद्धिक आणि कला संस्कृतीच्या दृष्टीने देशात अग्रेसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून जो राजकीय तमाशा सुरू आहे तो इतका संतापजनक आहे की यापेक्षा राष्ट्रपती राजवट परवडली असती निदान त्यात महाराष्ट्राचे हसे तरी झाले नसते. २४ तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पुढच्या महिन्याची १२ तारीख उलटून गेली तरीही अजून सरकार अस्तित्वात आले नाही. बरे असेही नाही की राज्यात त्रिशंकू स्थिती आहे, राज्यातील जनतेने शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत दिले आहे तर ९८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली आहे. असे असतानाही जर सरकार अस्तित्वात येणार नसेल तर महाराष्ट्रातील जनतेने या पुढे अशा लोकांना का निवडून द्यावे किंवा त्याच्याही पुढे जाऊन सांगायचे झाले तर निवडणुकीमध्ये तरी का भाग घ्यावा. महाराष्ट्रात गेल्या १५ दिवसांपासून सत्तेसाठी ज्या जोर बैठका सुरू आहे त्याला डोंबाऱ्याचा खेळच म्हणायला हवे. तू दोरीवरून चाललास तर मी बाटलीवर ठेवलेल्या फळीवरून कसरत करीन, तू कोलांट्या उड्या मारल्यास तर मी पेटत्या गोल रिंगेतून झेप घेईन, तू ढोल वाजवलास तर मी ताशा वाजवतो असा प्रकार डोंबाऱ्याच्या खेळा मधेच चालतो आणि अगदी तसाच प्रकार गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे आणि त्याची सुरवात शिवसेनेने केली. आम्हाला सत्तेत फिफ्टी-फिफ्टीचा वाटा आणि अडीज वर्ष मुख्यमंत्रीपद मिळाले तरच तुमच्या सोबत येऊन सत्ता स्थापनेसाठी दावा करू या शिवसेनेच्या भूमिकेला भाजपने विरोध केला. काही झाल तरी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार नाही अशी भाजपची भूमिका होती, कारण मावळते मुख्यमंत्री अनेक वेळा म्हणाले होते मीच पुन्हा येणार ,मीच पुन्हा येणार आणि त्यांच्या या बाल हट्टापायी केंद्रातील भंपक नेतृत्वानेही ताठर भूमिका घेतली शिवसेनेला पूर्वी दिलेला शब्द फिरवला आणि आम्ही असे काही बोललोच नव्हतो अशी पलटी खाल्ली. सत्तेसाठी खोटे बोलणे मित्रांना फसवणे हा तर भाजपचा जन्मसिध्द हक्कच आहे. जागा वाटपाच्या वेळी छोट्या मित्र पक्षांना १८ जागा देण्याचे आश्वासन देऊन १४ जागा दिल्या इतकेच नव्हे तर त्यांना भाजपच्या कमळाच्या तिकिटावर निवडणूक लढवायला भाग पाडले त्यानंतर शिवसेनेला १२६ जागा देतो असे सांगून १२२ जागा दिल्या आणि आता फिफ्टी-फिफ्टी च्या मुद्द्यावरही भाजपने पलटी खाल्ली. त्यामुळे जनमानसात भाजप विषयी काय संदेश गेला असेल तो त्यांना पुढच्या काळात दिसेल. शिवसेनेने ताणून धरतात भाजपने दुसऱ्या पक्षातल्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करून पाहिला पण दुसऱ्या पक्षातली नेते मंडळी सावध होती त्यांनी आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी नेऊन ठेवले त्यामुळे कर्नाटक किंवा गोव्यात जे भाजपने केले तसे त्यांना महाराष्ट्रात करता आले नाही. शेवटी सरकार बनवण्याबाबत आपली डाळ शिजत नाही हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी माघार घेतली आणि राज्यपालांनी सरकार बनवण्याचे आमंत्रण देऊनही पुरेशा संख्याबळ अभावी भाजपला सरकार बनवता आले नाही हा मोदी, शहा आणि फडणवीसांच्या नैतिक पराभव आहे. भाजपच्या माघारी नंतर सेनेला सरकार बनवण्यासाठी निमंत्रण देण्यात आले पण सेनेकडे त्यांचे स्वतःचे ५६ आणि ८ अपक्ष मिळून ६४ आमदार आहे आणि बहुमताचा आकडा म्हणजेच १४५ इतके संख्याबळ वाढवण्यासाठी त्यांना ८१ आमदारांची गरज आहे, त्यामुळे त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठींब्याची गरज आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सेनेला पाठींबा द्यायला तयार आहे पण त्यांच्या अटी आणि शर्थींमुळे सरकार स्थापनेस वेळ होतोय असे केले तरच तसे करू आणि तसे केले तरच असे करू असं काँग्रेस राष्ट्रवादीचे सुरू आहे. त्यासाठी रोज चर्चा आणि बैठका होत आहेत यात प्रत्येक पक्ष आपले हित बघूनच सावधपणे पावले टाकतोय. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची विचारसरणी भिन्न आहे, त्यामुळे शिवसेनेला पाठींबा देताना आपल्या मूळ विचारसरणीवर परिणाम होणार नाही ना याची काँग्रेस राष्ट्रवादी काळजी घेत आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला वेळ लागतोय पण त्यांना एक गोष्ट कळायला हवी होती की महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवा असाच एक अस्पष्ट कौल दिला आहे, आणि तुम्ही गेल्या पाच वर्षा पासून बोंबलत होता की आम्हाला भाजपला सत्तेतून घालवायचे आहे मग आता चालून संधी आलेली असताना कचखाऊपणा का करताय सेनेला पाठींबा देऊन लवकरात लवकर सरकार बनवा. आज महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती आहे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची वाट लावली आहे त्यांना मदतीची गरज आहे, अशावेळी राज्यात सरकारच नसेल तर बिचाऱ्या शेतकऱ्यांनी कोणाकडे पाहायचं कुठे मदत मागायची महाराष्ट्रासमोर इतरही अनेक प्रश्न आहेत ते कोण सोडवणार? काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारसरणी पेक्षा महाराष्ट्रातले प्रश्न अधिक महत्त्वाचे आहे असे असताना चर्चा बैठका यांचा जो खेळ सुरू आहे तो डोंबाऱ्याच्या खेळासारखाच आहे. महाराष्ट्रातले राजकारणी इतके संवेदनशून्य असतील असे वाटले नव्हते त्यांच्यात थोडी जरी माणुसकी आणि जबाबदारीची जाणीव असती तर त्यांनी सरकार स्थापनेसाठी इतका टाईमपास केला नसता तेंव्हा एकदाच काय ते ठरवा आणि सत्ता स्थापन करण्याबाबत निर्माण झालेली ही कोंडी फोडा एवढेच महाराष्ट्रातील जनतेचे म्हणणे आहे. मात्र तसे झाले नाही तर महाराष्ट्रातील जनतेचा सगळ्यांवरचाच विश्वास उडेल, कारण अस्थिर राजकीय परिस्थिती कोणत्याही नव्या संकटाला जन्म देऊ शकते आणि हे सगळं टाळायचं असेल तर शक्य तितक्या लवकर शिवसेनेला पाठींबा देऊन काँग्रेस राष्ट्रवादीने सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया पार पाडायला हवी, कारण महाराष्ट्रा सारख्या मोठ्या राज्यामध्ये अशी अस्थिर परिस्थिती राहत नाही. इथे एक गोष्ट मात्र नक्की की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेनेच्या मदतीने आघाडीला यश येत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र खुश आहे कारण भाजपाची मुजोरी मोडून काढण्यात महाराष्ट्रातील जनतेला यश आले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम