कपटी भाऊ
महाराष्ट्रात सध्या जो सत्तासंघर्ष सुरू झाला आहे त्याचा लवकरच फैसला होईल पण या सत्ता संघर्षाच्या निमित्ताने भावाच्या नात्याला जे बदनाम केले जात आहे त्याचा निषेध करावा तितका थोडाच आहे, कारण या नाट्य आडून कारस्थाने करणाऱ्या एका कपटी भावाचा चेहरा जनतेसमोर आला आहे. मोठा भाऊ हा नेहमीच समंजस असतो आणि आपल्या लहान भावंडांबद्दल त्याची भूमिका त्यागाची असते, कर्तव्याची असते आणि मोठ्या भावच हेच कर्तव्य असत की त्याने आपल्या धाकट्या भावाला सांभाळून घेणे आपल्या वाट्याचा घास त्याला भरवणे पण महाराष्ट्रात मात्र मोठ्या भावाने धाकट्या भावाला घास भरवायचे सोडाच त्याने कपटपणाने धाकट्या भावाच्या पुढ्यातले ताटच ओढून घेतले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात सत्तेचा तिढा निर्माण झाला आहे. मग युतीत मोठ्या भावाचे कर्तव्य विसरलेल्या भाजपला सत्ता देणार आहेत का? सध्या भाजपवाले सत्तेसाठी वेडेपिसे झालेत मीच पुन्हा येणार,मीच पुन्हा येणार,असे म्हणणारे देवेंद्र तर मुख्यमंत्रीपदासाठी इतके वेडे झालेत की आता ते फक्त लोकांवर दगडी मारायचे बाकी राहिले आहेत .सत्तेसाठी एवढा अट्टाहास! अरे पाच वर्षे मुख्यमंत्री होताना! मग अजूनही मुख्यमंत्रीपदाची हौस नाही फिटली का? बरे पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात असे काय दिवे लावलेत की पुन्हा तुम्हाला मुख्यमंत्रीपदाचा खुर्चीत लोकांनी बसवावे? आज शेतकरी धाय मोकलून रडतोय. महाराष्ट्रातले ५ लाख उद्योग धंदे बंद झाल्याने शहरी भागातील कामगार बेरोजगार झालाय, त्याची पोरबाळे उपाशी मरतायत, विदेशात फिरून आलात पण कवडीचीही गुंतवणूक आली नाही तरी मुख्यमंत्रीपदाची आस कशाला? मोठा भाऊ गेल्या पाच वर्षात कर्तव्यशून्य निघाला मग अशा वेळी छोट्या भावाला संधी मिळायला नको का? दोनशेपारचे स्वप्न पाहणाऱ्या मोठ्या भावाला यावेळी जनतेने शंभरच्या आसपासच गार करून तू सत्तेसाठी लायक नाहीस हे दाखवून दिले मग मोठा भाऊ लायक नसेल तर छोट्या भावाला संधी मिळायला नको का? बरे मोठ्या भावाची २५ वर्षांपूर्वी काय लायकी होती ते संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. वास्तविक छोटा भाऊ मोठ्या भावाचे बोट धरून पुढे जातो पण महाराष्ट्रात छोट्या भावाने मोठ्या भावाला बोट धरून चालायला शिकवले त्यावेळी जर त्याला कळले असते की जो मोठा भाऊ आज आपले बोट धरून चालतोय तोच उद्या आपले पाय छाटण्याचा प्रयत्न करणार आहे तर छोट्या भावाने त्याचवेळी त्याचा रायगडच्या टकमक टोकावरून कडेलोट केला असता पण छोटा भाऊ दिलदार होता त्याने मोठ्या भावाला आपल्या ताटातले घास देऊन नुसते जगवलेच नाही तर ताकद देऊन मोठेही केले म्हणजेच जे काम मोठ्या भावाने करायचे होते ते छोट्या भावाने केले आणि त्याच छोट्या भावाशी आज सत्ता लोभी मोठा भाऊ गद्दारी करायला निघालाय याचे प्रत्येक मराठी माणसाला दुःख आहे. तिकडचा एक नेता म्हणाला की फडणवीस हे शिवसैनिकच आहेत .म्हणजे सत्तेसाठी किती लाळघोटेपणा केला जाऊ शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. फडणवीस हे शिवसैनिक कसे होऊ शकतात? शिवसैनिक होण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम आणि मराठीचा अभिमान असावा लागतो. बाळासाहेबांनी जागवलेला मराठीचा स्वाभिमान रक्तात असावा लागतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या हितासाठी त्यागाची भावना असावी लागते. फडणवीसांमध्ये यातला एकतरी गुण आहे का? उलट २०१४ मध्ये फडणवीस म्हणाले होते की महाराष्ट्रापेक्षा मला विदर्भाचा मुख्यमंत्री झालेले आवडले असते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला फडणवीसांच्या छुपा पाठींबा आहे, तर शिवसैनिकांनी महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्या विदर्भ वाद्यांच्या पार्श्वभागावर चार लाथ घालून त्यांना हाकलले आहे. फडणवीस त्यातून वाचले हे त्यांचे सुदैव पण अशा पद्धतीने जो माणूस महाराष्ट्राचं मीठ खाऊन महाराष्ट्रावरच टांग वर करतो तो शिवसैनिक कसा होऊ शकतो? आणि अशा माणसाला महाराष्ट्राने दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून का स्वीकारावे? म्हणूनच यावेळी ज्याला महाराष्ट्राच्या हिताची काळजी आहे, महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना जो शेतकऱ्याच्या बांधावर धावून जातो त्यालाच मुख्यमंत्रीपदाचा खुर्चीत बसण्याचा अधिकार आहे. आणि म्हणूनच मुख्यमंत्रीपदाची खुर्ची महायुतीतल्या छोट्या भावालाच मिळायला हवी, कारण तोच या खुर्चीचा खरा हकदार आहे मग तो वयाने आणि नात्याने छोटा असला तरी चालेल जनतेने त्याच्याकडे बघूनच महायुतीला जनादेश दिला आहे तेंव्हा भावाच नात टिकवायचा असेल तर मोठ्या भावाची जबाबदारी आणि कुटुंबाप्रती असलेली त्यागाची भावना ओळखून बाजूला व्हा. छोट्या भावाच्या भविष्यच्या आड येऊन काळे मांजर ठरण्यापेक्षा इमानी चौकीदार बनून महाराष्ट्राचे रक्षण करा त्यातच तुमचे भले आहे. मोठ्या भावाचा आजवरचा इतिहास हा कपटाने भरलेला आहे. गोव्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत असतानाही तिथे फोडाफोडी करून सरकार बनवण्यात आले तर कर्नाटकातही तसेच झाले पण पहिल्या प्रयत्नात त्यांना तोंडघशी पडावे लागले आणि नंतर मात्र फोडाफोडीच्या जुन्याच तंत्राने कर्नाटकातली सत्ता मिळवली. मोठ्या भावाचा हा कपटाने भरलेला इतिहास छोट्या भावाला ठाऊक असतानाही छोटा भाऊ नको तितका मोठ्या भावाच्या आहारी गेला आणि म्हणूनच त्याच्यावर आज ही पाळी आली आहे पण यावेळी छोट्या भावाने माघार घेऊ नये असे संपूर्ण महाराष्ट्राचे म्हणणे आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम