
एक्झिट 'झोल'
- by Editor
- Oct 23, 2019
- 1040 views
लोकशाहीत गुप्त मतदान पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानापासून निकालापर्यंत गुप्तता पाळायला हवी. मतदारांना निकाल बाबत उत्सुकता असली तरी घाई नसते असे असताना इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांवर जे एक्झिट पोल दाखवले जात आहेत ते एक्झिट पोल नसून झोल आहेत. कारण त्यांना कोणताही शेंडाबुडा नाही. कारण मतदारसंघातील निकालाचा कल जाणून घेण्यासाठी मतदारांना भेटणे, त्यांनी कोणाला मतदान केले या सगळ्याचा सर्वे आवश्यक असतो आणि विधानसभेच्या एक मतदार संघात साधारणतः ३ लाख मतदार असतात. त्यातील ५० टक्के मतदारांनी जरी मतदान केले तरी त्यांची संख्या दीड लाख इतकी होते. मग मतदान संपल्या संपल्या एक्झिट पोलवाल्यांचे प्रतिनिधी एवढ्या लोकांनी केलेल्या मतदानाचा सर्वे तासाभरात कासा काय करतात ? कारण काल ६ वाजता मतदान संपताच सर्व चॅनलवर एक्झिट पोलची आकडेवारी सुरू झाली. कोणत्या मतदार संघात किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर करण्यापूर्वीच मतदार संघातील काल चॅनलवरच्या कुडमुड्या ज्योतिषांना कसे कळले ? कारण सर्व चॅनलवर युतीचे सरकार येणार हे जाहीर करण्यात आले. प्रत्येकाने युतीला १८० पासून २४३ पर्यंत जागा मिळतील असे सांगितलं आहे पण खरोखरच हे पटणारे आहे का ? कारण महाराष्ट्राच्या सर्व २८८ मतदार संघात वेगवेगळी स्थिती होती. मोदी आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांच्या भंपक भाषणांचा कुठल्याही मतदार संघातील मतदारांवर फारसा परिणाम झालेला नाही. त्यातच जागा वाटपाबाबत शिवसेनेत प्रचंड नाराजी होती. त्यामुळे अनेक मतदारसंघात सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवारांचे काम केलेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा भाजपच्याच पारड्यात मते टाकलीत असे कसे म्हणता येईल. मात्र चॅनलवाल्यांना सत्ताधाऱ्यांनी काहीतरी दक्षिणा देऊन आपल्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठीच ही खोटी आकडेवारी जाहीर करायला लावली आहे आणि या चॅनलवरच्या पोपटवाल्यांची भविष्यवाणी अनेकवेळा खोटी ठरली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत हेच लोक सांगत होते की भाजपला १५० पेक्षा अधिक जागा मिळतील पण प्रत्यक्षात भाजपला १०० जागाही मिळाल्या नाहीत. त्यामुळे चॅनलवरच्या कुडमुड्या ज्योतिषांवर लोकांनी विश्वास ठेवू नये कारण त्यांचे एक्झिट पोल हे पेड असतात. सत्ताधाऱ्यांकडून पैसे घेऊन खोटी आकडेवारी दाखवायची आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवायचे हाच यांचा धंदा आहे. यांच्या एक्झिट पोलचे अंदाज कोणत्याही वस्तुस्थितीचा निकषावर आधारलेले नाहीत ही एक सुपारी आहे. ज्याप्रमाणे माफिया लोक एखाद्याची सुपारी घेऊन त्यांच्या शत्रूचा गेम करतात. त्याच प्रमाणे सत्ताधारी सेना भाजपची सुपारी घेऊन या मीडिया माफियांनी विरोधी पक्षाचा गेम वाजवण्याची षडयंत्र रचले आहे. त्यामुळे जनतेने चॅनलवाल्यांच्या एक्झिट पोलवर जराही विश्वास ठेवू नये. २४ तारखेला निकाल आहे त्यामुळे घोडामैदान अवघ्या काही तासांवर आहे. बघूया काय होते पण एक मात्र नक्की की यावेळी एक्झिट पोलचे निकाल खोटे ठरणार यात शंकाच नाही कारण लोकांनी केलेल्या मतदानाचा कल जाणून घेण्यासाठी एखाद्या मतदारसंघात फेरफटका मारून प्रत्यक्ष त्या मतदाराला भेटावे लागते. पाच-पन्नास लोकांशी बोलून तुम्ही दीड लाख मतदारांनी केलेल्या मतदानाचा अंदाज कसा काय व्यक्त करू शकता ? लोकांनाही आता पोलवाल्यांचे झोल समजायला लागले आहेत. म्हणूनच चॅनलवाल्यांनी कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार हे सांगण्यापेक्षा ही खोटी आकडेवारी दाखवण्यासाठी सेना भाजप कडून किती पैसे घेतले हे सांगावे बरे. यांची आणखी एक घाण सवय आहे ती म्हणजे एखाद्या मतदार संघात एखादा मोठा नेता निवडून आला की तो नेता निवडून येणार हे अगोदरच आम्ही सांगितले होते असे म्हणत श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात. वाराणसी मतदार संघाच्या बाबतीत हाच प्रकार घडला होता. आता मोदी हे लोकप्रिय नेते आहेत त्यामुळे ते निवडून येणारच आणि ते सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नव्हती पण निकाल लागताच आमचा अंदाज खरा ठरला मोदी निवडून आले असे चॅनलवरचे कुडमुडे ज्योतिषी आरोळ्या ठोकू लागले. आता काय म्हणावे या मूर्खाना? एखाद्या माणसाचे लग्न झाले की त्याला मुल होणारच पण तिथेही हे सांगतील की त्याला मुल होणार हे आम्ही अगोदरच सांगितले होते आणि आम्ही अंदाज वर्तवल्यामुळेच मुल झाले असेही हे कुडमुडे ज्योतिषी सांगायला मागेपुढे पाहणार नाहीत, तेंव्हा यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. निवडणूक जर गुप्त मतदान पद्धतीने घेतली जातेय तर निकालापर्यंत गुप्तता रखायलाच हवी आणि निकालाच्या अगोदरच एखाद्या पक्षाला खात्रीने एवढ्या जागा मिळणार तेवढ्या जागा मिळणार असे जाहीर करणे हा सुद्धा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भाग आहे. त्यामुळे मतदानानंतर निवडणूक आयोगाकडून मतदानाची टक्केवारी जाहीर होण्यापूर्वीच एखाद्या पक्षाला सत्तेत नेऊन बसवणे ही सरळसरळ फसवणूक आहे. त्यामुळे अशा लोकांवर कायद्याने गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी जनतेची मागणी आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम