
जातीयवादी रॅगिंग
- by रघुनाथ किसन ढेकळे
- May 29, 2019
- 1522 views
आर्थिक,सामाजिक,आणि बौद्धिक दृष्ट्या प्रगल्भ म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र आज एका वेगळ्याच प्रकारामुळे बदलला जातोय. महाराष्ट्रात जातीयवादास अजिबात थारा नाही. पण देशात आज जे हिंदुत्वाचे वारे वाहू लागलेय .त्याने पुरोगामी महाराष्ट्रांचीही ओळख बदलून टाकलीय.आणि डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्त्या प्रकरणाने हे अधोरेखित केलेय.खरे तर वैद्यकीय क्षेत्रा सारख्या सेवाभावी क्षेत्रात काम करणारे उच्च शिक्षित लोक हे बुद्धिवादी असतात त्यामुळे त्यांचा सामाजिक दृष्टिकोन हा जातीपातीच्या पलीकडचा असायला हवा पण नायर रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य उच्च वर्णीय कर्मचार्यांनीच जातीपातीच्या नावाने एका मागासवर्गीय डॉक्टर तरुणीचे रॅगिंग केले आणि या रॅगिंगला कंटाळून पायलने आत्महत्त्या केली.त्यामुळे या घटनेमध्ये जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी .या प्रकरणी ज्या तीन महिला डॉक्टरांना अटक झालीय त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द व्हायला हवा.शिवाय त्यांच्यावर अट्रोसिटी कायद्यान्वये कारवाई करताना त्या केवळ महिला आहेत म्हणून त्यांना सहानुभूती सुद्धा दाखवता नये .कारण उच्च शिक्षित माणसांची मानसिकता जर इतकी खालच्या पातळीची आणि जातीयवाद ला खतपाणी घालणारी असेल तर त्यांना समाजात आणि वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून काम करण्याचा अधिकारच नाही.आज त्यांनी आपल्या एका सहकारी महिला डॉक्टरचा ती केवळ हलक्या जातीची होती म्हणून मानसिक छळ केला आणि तिला आत्महत्त्या करायला लावली. उद्या जर एखादा मागासवर्गीय पेशंट त्यांच्याकडे उपचारासाठी गेला तर त्याला उपचाराने बरे करण्याऐवजी या जातीयवादी महिला डॉक्टर त्या पेशंटला मारून टाकतील .सरकारने आणि न्याय पालिकेने याच गोष्टीचा विचार करून त्यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी .पण या गोष्टी घडण्यामागे अनेक कारणे आहेत त्यातील प्रमुख कारण म्हणजे मागासवर्गीयांना मिळणारे आरक्षण आणि त्यातून होणारी त्यांची प्रगती!आरक्षणामुळे दलित पीडित शोषितांना शिक्षणाची दारे खुली झाली आणि त्यातून त्यांनी इतकी प्रगती केली की कोणी डॉक्टर,कोणी इंजिनियर,कोणी कलेक्टर झाले. राज्याच्या मुख्यमंत्री पदावरही दलित समाजाचा माणूस विराजमान झाला. त्यामुळे वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारे सनातनी बिथरले आणि त्यांनी आजच्या तरुण पिढीला आरक्षणाच्या विरोधात उभे केले आरक्षणामुळे आपल्यावर अन्याय होतोय आणि दलित समाज पुढे जातोय अशी भावना सवर्ण तरुण तरुणींच्या मनामध्ये रुजवली त्यामुळेच विविध क्षेत्रातील सवर्ण तरुणतरुणींना आपल्याच बरोबर काम करणाऱ्या दलित मागासवर्गीय तरुण तरुणी बद्दल तिरस्कार वाटू लागलाय आणि याच तिरस्काराची भावनेतून पायल तडवीचे तिच्याच सहकाऱ्यांकडून रॅगिंग झाले आणि त्या रॅगिंगला कंटाळून पायलने आपले जीवन संपवले. पायल तडवीचे हे प्रकरण केवळ तिच्या आत्महत्ते पुरतेच मर्यादीत नसून पायलच्या आत्महत्ये मुळे महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .पुरातन काळातील वर्णवादाची जातीय छटा आजच्या विज्ञान युगातील निधर्मवादी पिढीवरही पडणार आहे का?त्यासाठी कोण प्रयत्न करीत आहेत?आणि समाजात जातीपातीच्या भिंती उभ्या करणाऱ्या आशा लोकांवर सरकार कारवाई करणार आहे की नाही.आजही सनातन आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या संघटना हिंदुत्वाच्या नावाखाली तरुणांना दलित मुस्लिमांविरुद्ध भडकवत आहेत आणि सरकार हिंदुत्व वाद्यांचे असल्याने अशा संघटनांकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळेच ४ वर्ष उलटून गेली तरी दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होऊ शकली नाही . कारण त्यांना विश्वास आहे की सरकार कोणत्याना कोणत्या मार्गाने आम्हाला वाचवेल. जो विश्वास सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांच्या चेहऱ्यावर अटकेनंतरही दिसत होता तोच विश्वास पायल तडवीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या आरोपी डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आज दिसतोय. त्यामुळेच दलित मुस्लिमांच्या मनात आज असुरक्षिततेची भावना आहे. फडणवीस यांचे सरकार पायलला न्याय देऊ शकेल की नाही याबाबत लोकांच्या मनात शंका आहे.आणि याच शंकेत पुढे असंतोषाची बीजे रोवली जातील. महाराष्ट्रासाठी ही खरोखरच चिंतेची बाब आहे. राहता राहिला प्रश्न रॅगिंगचा तर रॅगिंग विरुद्ध म्हणावा तसा कठोर कायदाच अस्तित्वात नाही.आणि शाळा कॉलेजात रॅगिंग करणारी मुले ही मोठ्या बापाची बिघडलेली कार्टी असल्याने त्यांचे कुणीच काही वाकडे करू शकत नाही. मात्र रॅगिंगचा हे जातीयवादी स्वरूप महाराष्ट्रासाठी घातक ठरू शकते
रिपोर्टर
संपादक - दैनिक आदर्श महाराष्ट्र
आदर्श महाराष्ट्र वेब टीम