
वंचितचा 'भीमटोला'
- by रघुनाथ किसन ढेकळे
- May 27, 2019
- 1001 views
लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता सगळ्यांचे लक्ष लागलेय ते पुढील काही महिन्यात
होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीकडे. लोकसभा निवडणुकीतील मोठ्या
यशानंतर शिवसेना भाजप युतीचा आत्मविश्वास वाढलाय पण त्याचबरोबर युतीशिवाय
पर्याय नाही ही वस्तुस्थिती सुद्धा युतीच्या नेत्यांच्या ध्यानात आलेली
आहे. शिवाय युतीतल्या नेत्यांमध्ये आता पूर्वीसारखे वैमनस्यही राहिलेले
नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत ते भक्कमपणे एकत्र उभे राहणार. पण
काँग्रेस राष्ट्रवादीचे काय? लोकसभा निवडणुकीत त्यांचा जो दारुण पराभव
झालाय त्यातून सावरायला त्यांना वेळ लागेल. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी
वंचित बहुजन आघाडी बाबत जी चूक केली ती विधानसभा निवडणुकीत करू नये अन्यथा
काँग्रेस राष्ट्रवादी महाराष्ट्रात औषधालाही उरणार नाही. या दोन्ही
पक्षांचा प्रामुख्याने दलित मुस्लिम हाच मतदार आहे. पण लोकसभा निवडणुकीत हा
मतदार वंचित आघाडीच्या मागे उभा राहिल्यामुळे विरोधकांच्या मतांचे मोठ्या
प्रमाणावर विभाजन होऊन त्याचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसला. कारण
अनेक मतदारसंघांमध्ये वंचित आघाडीने दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मते
घेतली इतकेच नव्हे तर औरंगाबाद सारख्या युतीच्या बालेकिल्ल्यात घुसून चार
वेळा खासदार राहिलेल्या सेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला. याचाच अर्थ
दलित मुस्लिमांच्या एक गठ्ठा मतांनी केवळ काँग्रेस राष्टवादीलाच नाही तर
सेने भाजपलाही आपल्या ताकदीची चुणूक दाखवली. त्यामुळे युतीच्या भगव्या
तंबूनेही वंचितची दहशत घेतलीय. वंचितचे हे वादळ विधानसभेत काँग्रेस
राष्ट्रवादी आणि सेना भाजपलाही धोक्याचा इशारा देणारे आहे. काँग्रेसची तर
देशभर वाताहत झाली असल्यामुळे १८ राज्यांमध्ये त्यांना खातेही खोलता
आलेले नाही. प्रतिष्ठेच्या अमेठी मध्ये पक्षाध्यक्ष राहुल गांधींचा पराभव
झाला. प्रियंकाचाही युपी मध्ये करिश्मा चालला नाही. यूपीमध्ये काँग्रेसने
लढवलेल्या ६७ जागांपैकी ६३ जागी काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
त्यामुळेच दलित मुस्लिमां शिवाय काँग्रेसला पर्याय नाही. म्हणूनच वंचित
आघाडीचा प्रयोग देश पातळीवर सगळ्याच राज्यांमध्ये व्हायला हवा. तरच
काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षांची अब्रू वाचेल. महाराष्ट्रात काँग्रेसची
फक्त एकच जागा आली, प्रदेशाध्यक्ष पडले याचा अर्थ काँग्रेसने पूर्णपणे
जनाधार गमावला असून काँग्रेसची अवस्था प्रादेशिक पक्षांपेक्षाही वाईट झाली
आहे. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस समोर अस्तित्व टिकवण्याचे
मोठे आव्हान उभे आहे .म्हणूनच काँग्रेस राष्ट्रवादीने आतापासूनच वंचित
आघाडीची ताकद ओळखून त्यांच्याशी सन्मानाने समझोता करावा आणि त्यांना आघाडीत
सामील करून घ्यावे. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या ताकदीचा अंदाज संपूर्ण
महाराष्ट्राला आला असल्यामुळे वंचितला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्रात
काँग्रेस-राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीचा सामना करूच शकत
नाही. आता विशेषतः काँग्रेसची अग्नी परीक्षा आहे. पवारांचे काय ते नेहमीच
दोन दगडांवर पाय ठेवून असतात आणि बेरजेचे राजकारण करताना सरशी तिकडे पारशी
हेच त्यांचे धोरण असते. आणि तसेही मोदी बरोबर त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत.
त्यामुळे उद्या पवारांनी भगवा खांद्यावर आणि कमल हातात घेतल्यास कोणालाही
आश्चर्य वाटणार नाही . पण काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व नसल्याने काँग्रेसचे
भवितव्य अधांरमय झाले आहे, त्यामुळे आंबेडकर हाच त्यांच्यासाठी प्रकाशाचा
किरण आहे. तेंव्हा विधानसभा निवडणुकीत वंचितला आघाडीत सामावून घेणे आणि
त्यांच्यासाठी जास्तीत जास्त जागा सोडणे यातच काँग्रेस-राष्ट्रवादीचे भले
आहे. अन्यथा विधानसभा निवडणुकीतही वंचितच्या भीमटोल्याने त्यांचा कपाळमोक्ष
होऊ शकतो.
रिपोर्टर
संपादक - दैनिक आदर्श महाराष्ट्र
आदर्श महाराष्ट्र वेब टीम