'एक्झिट' पोलवाल्यांची पोपटपंची
एक्झिट पोलवाल्यांची अवस्था हत्तीच्या सिद्धांताच्या गोष्टी सारखी आहे. चार आंधळे हत्तीला स्पर्श करून तो कसा आहे ते सांगतात. ज्याने हत्तीच्या पाठीला स्पर्श केला तो म्हणतो हत्ती भिंती सारखा आहे. ज्याने शेपटीला स्पर्श केला तो म्हणतो हत्ती केरसुणी सारखा आहे, ज्याने हत्तीच्या पायाला स्पर्श केला तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे.
- by रघुनाथ किसन ढेकळे
- May 20, 2019
- 953 views
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडले. त्यामुळे आता सर्वांचे डोळे २३ मे च्या निकालाकडे लागलेत. पण तत्पूर्वी मधल्या चार दिवसात एक्झिट पोलवाल्यांना झेलावे लागणार आहे कारण लोकसभेच्या ५४३ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत कोण निवडून येणार आणि कोणाचा पराभव होणार हे सांगण्यासाठी न्युज चॅनलवर एक्झिट पोलवाल्यां मध्ये अक्षरश:चढाओढ लागणार आहे. तशी एक्झिट पोलवाल्यांची पोपटपंची यापूर्वीच सुरू झालीय पण आता त्याचा वेग अधिक वाढणार आहे. वास्तविक लोकशाहीत गुप्तमतदान पद्धतीने निवडणुका होत असल्याने मतदानानंतर मतदाराला कोणाला मत दिलेस असे विचारणे आणि अशा दोनचार मतदारांशी बोलून निकालाचा अंदाज व्यक्त करणे पूर्णपणे चुकीचे आहे आणि ती एक प्रकारे लोकांची फसवणूकही आहे. कारण एक लोकसभा मतदार संघात सरासरी १० ते १२ लाख मतदार असतात त्यातले सगळेच काही मतदान करीत नाहीत. समजा ५० टक्के लोकांनी मतदान केले तरी त्यांनी कोणाला मतदान केले हे एक्झिट पोलवाल्यांना का सांगावे ? बरे निवडणुकीच्या निकालाचा अचूक दावा करणारे चॅनेलवाले मतदान करणाऱ्या ५ लाख मतदारांपैकी ५०० मतदारांपर्यंत तरी पोहचतात का? मग ते अचूक निकालाचा दावा कसा काय करू शकतात. मोदी हे सध्या जनतेत लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या वाराणसी मतदार संघात त्यांच्या विरोधात काँग्रेसने अजय रॉय या कमजोर उमेदवाराला मैदानात उतरवले आहे अशा स्थितीत मोदी निवडून येणार हे सांगायला एक्झिट पोलवाल्यांची किंवा कुठल्या पोपटवाल्या ज्योतिषाची गरज नाही. तरीही मोदी निवडून येणार असा आम्हीच अंदाज व्यक्त केला होता असे सांगून मोदींच्या विजयाचे क्रेडिट घ्यायला हे एक्झिट पोलवाले कुडमुडे ज्योतिषी पाहिले पुढे असतील. तसे पाहता खरे सांगायचे झाल्यास इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे आज संपूर्ण मिडियाचीच विश्वासहर्ता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण या लोकांना नको त्या उठाठेवी करायची सवय लागली आहे. हा, बातम्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या निकालाचा अंदाज व्यक्त करायला कुणाचीही हरकत नाही. पण आम्ही एवढ्या मतदारसंघात फिरलो, तेवढ्या मतदारांशी बोललो, त्यामुळे आम्ही सांगतोय तोच पक्ष आणि तोच उमेदवार निवडून येणार असे पोकळ दावे कशासाठी?. लोकांना २३ तारखेपर्यंत वाट पाहु द्यात, देशवासीयांमध्ये तेवढी सहनशीलता आहे. असे असताना तुम्ही का लोकांचं डोकं खाताय. एक्झिट पोलवाल्यांची अवस्था हत्तीच्या सिद्धांताच्या गोष्टी सारखी आहे. चार आंधळे हत्तीला स्पर्श करून तो कसा आहे ते सांगतात. ज्याने हत्तीच्या पाठीला स्पर्श केला तो म्हणतो हत्ती भिंती सारखा आहे. ज्याने शेपटीला स्पर्श केला तो म्हणतो हत्ती केरसुणी सारखा आहे, ज्याने हत्तीच्या पायाला स्पर्श केला तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे. तशीच अवस्था या एक्झिट पोलवाल्यांची आहे. त्यामुळे या एक्झिट पोलवर बंदी घालावी अशी मागणी आता होऊ लागलीय कारण एक्झिट पोलवाल्यांची दावे ही निव्वळ फसवणूक आहे. १०० ते २०० लोकांशी बोलून तुम्ही ५ लाख मतदाराच्या मतदानाचा तुम्ही कसा काय अंदाज व्यक्त करू शकता आणि ज्या मतदारांशी तुम्ही बोललात त्यांनी कोणाला मतदान केले हे तुम्हाला कशावरून खरे सांगितले असावे?. तेंव्हा एक्झिट पोलवाल्यांची निकलाबाबतची पोपटपंची एकदम बकवास असून लोकांचाही त्यावर अजिबात विश्वास नाही.
रिपोर्टर
संपादक - दैनिक आदर्श महाराष्ट्र
आदर्श महाराष्ट्र वेब टीम