भाजपाला लागले पालिका निवडणुकांचे डोहाळे .

बदलापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेल्या कुळगाव बदलापूर व अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुका केव्हा होतील? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे असताना भाजपाला मात्र आगामी पालिका निवडणुकांचे डोहाळे लागले आहेत. या निवडणुका जिंकण्याचा निर्धार व्यक्त करून कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार किसन कथोरे यांनी केले आहे.
                
भाजपा जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांची एक बैठक बुधवारी रोजी  गोवेली येथे पार पडली. खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी आदी परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना आमदार किसन कथोरे यांनी आगामी जिल्हा परिषद तसेच नगर पालिका व नगर पंचायत जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. अंबरनाथ व कुळगाव बदलापूर नगर परिषदेत सध्या प्रशासकीय राजवट असून नोव्हेंबर महिन्यात मुरबाड व शहापूर नगर पंचायतीतही प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. या निवडणुका केव्हा होतील, याबाबत सध्या सांगता येत नसले तरी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे असे आवाहन किसन कथोरे यांनी केले. या आगामी  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर पंचायत क्षेत्रात दोन प्रभागांची जबाबदारी एका पदाधिकाऱ्यावर तर नगर पालिका क्षेत्रात एका प्रभागासाठी एका पदाधिकाऱ्यावर जबाबदारी देण्यात येणार असल्याचे कथोरे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा कार्यकारिणीत कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील तीन माजी नगरसेवकांना स्थान देण्यात आले आहे. जिल्हा उपाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांची तर माजी नगरसेवक प्रशांत कुलकर्णी यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांची जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मीडिया संयोजक पदी बदलापुरातील मिलिंद धारवाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट