लेप्टोस्पायरोसिसचा धोका टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन

नवी मुंबई - पावसाळा कालावधीत जलजन्य आजाराचे प्रमाण वाढते हे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक सर्व खबरदारी घेतली असून त्यादृष्टीने औषध साठा उपलब्ध करून ठेवला आहे. पावसाळा कालावधीत अतिवृष्टी आणि भरतीची वेळ एकत्र आल्यास सखल भागामध्ये पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. हे सखल भागामध्ये साचलेले पावसाळी पाणी गटारातील सांडपाण्याव्दारे दूषित होण्याची शक्यता असते. या पाण्याशी संपर्क आल्यास किंवा त्यामध्ये वावरल्यास लेप्टोस्पायरोसिस आजाराच्या धोक्यात वाढ होते.

लेप्टोस्पायरोसिस हा आजार लेप्टोस्पायरा या जीवाणूपासून होतो. सदर जिवाणूचा प्रसार रस्त्यावर असणारे गाई, म्हशी, शेळी, बकरी  डुक्कर, कुत्री अशा प्राण्यांच्या लघवीवाटे दूषित पाण्यामध्ये होतो.

त्यामुळे लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा धोका पाण्यात काम करणारे हा बांधकामावरील कामगार, मच्छीमार, नालेसफाई कामगार, कत्तलखान्यात काम करणारे कामगार, ट्रक ड्रायव्हर, पाळीव प्राण्याची देखभाल करणारे या व्यवसायातील कामगार यांना जास्त प्रमाणात असतो.

पावसाळा कालावधीत लेप्टोस्पायरोसिस आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता नागरिकांनी,

सांडपाणी विरहित पाण्याच्या ठिकाणी ये – जा करणे तसेच चेहरा व हात याच्याशी संपर्क येणार नाही यांची काळजी घ्यावी, काही अपरिहार्य कारणाने दूषित पाण्याशी संपर्क येत असल्यास हातमोजे व गमबुटचा वापर करावा, दूषित पाण्याशी संपर्क आल्यास हात,पाय हे साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत, दूषित पाण्यावर वाढलेल्या पालेभाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात, हातापायावरील जखमांवर जंतूविरोधी क्रीम लावावे, राहिलेले शिळे अन्न उघडयावर न टाकता बंद कचरापेटीमध्ये टाकण्यात यावे, आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. जेणेकरुन उंदीर व घुशीचा प्रादुर्भाव टाळता येईल.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील नागरिकांना तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, डोळयांची जळजळ व लालसर होणे, अंगदुखी व पोट-या दुखणे, छातीत दुखणे, दम लागणे व  कावीळ यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित नजिकच्या नमुंमपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक रुग्णालयाशी संपर्क साधून उपचार घ्यावेत. लेप्टोस्पायरोसिस आजाराबाबत योग्य माहिती, योग्य वैदयकिय सल्ला व प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन सदर आजाराचा प्रसार थांबविण्याचे आवाहन नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट