पनवेलमध्ये रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर, प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांच्या उपस्थितीत शेकडो महिलांचा रिपब्लिकन सेनेत प्रवेश

नवी मुंबई - रिपब्लिकन सेना सरसेनानी  आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाला अनुसरून रिपब्लिकन सेना पनवेल जिल्हा कार्यकारणीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा व महिला पक्ष प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे व प्रमुख अतिथी प्रदेश सचिव श्रीपती ढोले, यांना आमंत्रित करण्यात आले होते. 

रायगड जिल्हाप्रमुख जीवनभाई गायकवाड यांच्या नेतृत्वात लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामविलास पासवान यांचे माजी जिल्हाध्यक्ष व या कार्यक्रमाचे आयोजक संतोष पवार यांनी आपल्या समर्थकांसह रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला व शेकडो महिला रिक्षा चालकांसह महिला कार्यकर्त्यांना देखील यावेळी पक्षात सामील करण्यात आले.

भारतीय राजकारणातील वर्तमान स्थितीला अनुसरून देशाला फक्त आंबेडकर घराणे सावरू शकते इंदू मिल ची लढाई जिंकून सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांना आंबेडकरी बाणा दाखविला आहे येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएम मशीन, बेरोजगारी, नोटबंदी, महागाई अशा विषयांवर सत्तेत येऊन तोडगा काढण्यासाठी रिपब्लिकन सेनेला मजबूत करा त्या अनुषंगाने पक्षप्रवेश मेळाव्यांचे आयोजन करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर यांनी केले.  

याप्रसंगी नवी मुंबई महिला जिल्हा सचिव संगीता चौधरी, महिला कार्याध्यक्ष दीपाताई बम, ऐरोली विधानसभा प्रमुख प्रकाश वानखडे, शैलेंद्र पवार आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

"कॅडर कॅम्प घेऊन सभासद नोंदणी अभियान सुरू करून पक्ष वाढीची प्रक्रिया सुरू केली जाईल. आपले मत विकून आपण आपली किंमत विरोधकांना दाखवत आहोत आपले मत हे अमूल्य आहे त्याची किंमत ओळखा" असे आवाहन करत केवळ रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारांना निवडून आणा असे कळकळीचे आवाहन सागर डबरासे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

संबंधित पोस्ट