ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नम:!! श्रीक्षेत्र गगनगडावर भक्तीचा मळा फुलला!

कोल्हापूर- जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील श्रीक्षेत्र गगनगडावरील  श्रीदत्तजयंतीमहोत्सवाची जोरदार तयारी झाली असून या दिव्य स्थानी होणारे श्रीदत्तजयंती सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रांतील विविध भागातून, खासकरून मुंबई-पुणे-सांगली-सातारा-कोल्हापूर भागातून भक्तांच्या पायी-दिंडी पालख्या,तसेच मानाच्या दिव्य ज्योती (मशाल) यात्रा श्रीक्षेत्र गगनगडावर मार्गस्थ होताहेत, संपूर्ण गड परिसर श्रीदत्तात्रेयांचे नामस्मरणाने आणि स्वामी गगनगिरी महाराजांचे जयघोषात दुमदुमून गेला आहे,सर्वत्र भक्तीमय,चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले असून गगनगडावर भावभक्तिचा मळा फुललाय.

सदरहू श्री गगनगिरी महाराजांचे श्रीदत्त जयंती महोत्सवास,मंगळवार दिनांक ६ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून सदर उत्सवाची सांगता शुक्रवार दिनांक ९ डिसेंबर रोजी होम-हवनाचे कार्यक्रमाने होणार आहे.

या उत्सवाचे निमित्ताने श्रीक्षेत्र गगनगडावर उत्सवाचे मुख्य दिनी, बुधवार दि.७ डिसेंबर रोजी,श्री.दत्तजयंती दिनी पहाटेपासून उत्सवास प्रारंभ होणार असून स्वामी श्री.गगनगिरी महाराज व श्रीदत्तात्रेय महाराज यांचे मूर्तिवर मंगलस्नान आणि पादुकावर अभिषेक-पुजन करण्यात येणार असून या स्थानी विविध भजनी मंडळाची भजने-प्रवचने-किर्तने तसेच नामस्मरण होमहवन-भंडारे त्याचबरोबर दत्तजन्मोत्सव सोहळा आणि ढोल-ताशे-लेझीमच्या साथीने, हजारो भाविकांच्या चैतन्यमय उपस्थितीत निघणारी भव्य पालखी मिरवणूक व विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

सदर श्रीदत्त जयंतीमहोत्सव व्यवस्थित पार पडण्यासाठी श्रीक्षेत्र गगनगडाचे सर्व सेवेकरी मंडळी,मानकरी-पदाधिकारी, अहोरात्र परिश्रम घेत असून विश्वस्त श्री.बापूसाहेब पाटणकर, श्री.रमेशराव माने, श्री.संजयसिंह पाटणकर स्वत: जातीने देखभाल करीत असून, यंदाचा हा श्रीदत्तजयंतीमहोत्सव हा अतिशय दिमाखात व चैतन्यमय वातावरणात संपन्न होऊन संस्मरणीय  होईल, असा ठाम विश्वास, स्वामी गगनगिरी महाराजांचे पुतणे व उत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय श्री.बापूसाहेब पाटणकर यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित पोस्ट