सेक्सटॉर्शनचा विळखा......सावधान!

सोशल मीडिया आणि इंटनेटच्या मायाजालात पूर्णतः अधीन गेलेलं मानवी विश्व भावनिक गुंतागुंतीच्या खोल गर्तेत अडकलेलं आहे.. या आभासी जगतातून बाहेर पडून वास्तवाला भिडणे आता आवश्यक आहे.  सोशल मीडिया सारखे दुधारी शस्त्र आता एकधारी शस्त्र बनत चालले आहे. डेटिंग अँप्स, मॅरेज ब्युरो अँप, सोशल अँप वरून होणारी फसवणूक, लैंगिक छळणूक आणि ब्लॅकमेलिंग, म्हणजेच ‘सेक्सटॉर्शन’ प्रकाराने समाजमन अस्वस्थ झालं आहे. का घडतात या गोष्टी..का बळी पडतात लोक..याचा सांगोपांग विचार केला जाणे आवश्यक आहे. कारण यात बळी पडणारे एका विशिष्ट वयाचे नाहीत..तरुणांपासून ते वृद्ध लोकही सेक्सटॉर्शनचे बळी आहेत... देशात रोज सेक्स्टॉर्शनच्या १००० हुन घटना घडत आहेत त्यात बहुसंख्य महिला आहेत त्यामुळे बदनामीच्या भीतीने जेमतेम अर्धा टक्का घटनांच्या तक्रारीही दाखल होत नाही. पुण्यात सेक्सटॉर्शनच्या त्रासाला कंटाळून दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर या घटनेचे गांभीर्य दिसून आले. 
 तंत्रज्ञानाच्या मदतीने जग जवळ आलं आहे. फेसबुक, ट्विटर, युट्युब अशा अनेक सोशल मीडियाची  निर्मिती सकारात्मक सामाजिक दृष्टी समोर ठेवून करण्यात आलेली असली तरी याच्या गैरवापरामुळे माध्यमाचे जग वास्तववादी आहे, की आभासी ? हा एक गहन प्रश्न निर्माण झाला आहे. सोशल मीडिया तुम्ही कसे वापरता, त्यावर काय वाचता तसेच काय पाहता यातून तुमचे अंतरंग आणि प्रतिमा घडत असते. फेसबुक किंवा इतर सोशल अँप्स वर होणारे कौतुक किंवा फोटोवर मिळणाऱ्या लाईक्स आणि कमेंट्सच्या मोहात न अडकता त्याचा वापर सावध आणि सजगरीत्या करायला पाहिजे. सोशल मीडिया अफूच्या गोळी सारखी आहे, या अफूचे लागलेले व्यसन माणसाला तात्पुरता आनंद देतं परंतु नंतर कायमचं निराशेच्या, असहाय्यतेच्या, भीतीच्या गर्तेत नेतं..पुण्यात त्या दोन तरुणांसोबत हेच झालं..या तरुणांना हेरलं गेलं, त्यांच्याशी सलगी केली, नंतर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ शेअर करायला सांगितले. या तरुणांनी तसे फोटो, व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं, पैशांची मागणी केली. पैसे देऊनही सतत ब्लॅकमेल केलं जाऊ लागलं.. शेवटी बदनामीच्या भीतीने दोघांनीही आत्महत्या केली. या मुलांच्या आत्महत्येने हा विषय गांभीर्याने पुढे आला असला तरी सेक्सटॉर्शनचा प्रकार हा काही नवीन नाही.. यापूर्वी महिलांच्या बाबतीत असे प्रकार सर्रासपणे घडताना दिसत होते. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षात पुरुषांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकविण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळकरी मुलांपासून ते तरुणांपर्यंत आणि वृद्धांपर्यंत सगळे लोक यात भरडले गेले आहेत. या प्रकरणात बदनामी होण्याच्या भीतीचे कित्येकांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. सध्या सेक्सटॉर्शनचे जाळे सोशल मिडियाच्या माध्यमातूनच ग्रामीण भागापर्यंतही पोहचले असून समस्या गंभीर बनत चालली आहे. थेट फेसबुक मेसेंजर किंवा व्हाटसअँपवर अचानकपणे सुंदर मुलीचा प्रोफाइल फोटो असलेल्या अनोळखी क्रमांकावरून 'हाय हॅलो'चा मेसेज येतो. त्याला प्रतिसाद दिला की, गोड बोलून त्याच्याकडून अधिक माहिती काढून घेतली जाते. वारंवार संवाद साधल्यानंतर अश्लील संवाद सुरू होतो. संवाद सुरू झाल्यानंतर शारीरिक संदर्भातील व्हिडिओ संवाद सुरू होतो. आणि याचाच फायदा घेऊन स्क्रीन रेकॉर्ड केलं जातं. इथून खेळ सुरू होतो पैसे देवाण-घेवाणीचा. जर पैसे नाही दिले तर व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करुन बदनामी करण्याची धमकी दिली जाते. अन् मग सुरुवात होते मानसिक छळाची, खंडणी मागणीची आणि ब्लॅकमेलिंगची. यातून पुढे खून, बलात्कारासारखे गंभीर गुन्हेही घडत जातात. या ट्रॅपचे प्रमाण फेसबुक आणि व्हॉट्सअपवर जास्त आहे. पुण्यातील सेक्सटॉर्शन प्रकरणी तपास सुरू असताना पुणे पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली. पुण्यातील तरुणांना ज्या मोबाईल नंबरवरून धमकावलं जात होतं, त्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करून पोलिसांना राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड गुरुगोठडी गावाचं लोकेशन सापडलं. या लोकेशनवर पोलिसांनी आरोपी अन्वर खान याला अटक केली असता गुरुगोठडी गावातील जवळपास २५०० लोक आणि महिलाही सामील असल्याचे लक्षात आलं. आरोपी पकडले असले तरी पोलिसांपुढे तपासाचे आव्हान फार मोठं आहे. कारण याची सूत्रे परदेशातून हलवली जात आहे. सेक्सटॉसर्शन मधला सगळा पैसा परदेशात जात आहे. इथल्या गरिबीचा फायदा घेऊन गावाला फक्त एक प्यादं म्हणून वापरलं गेलं आहे..
सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात मुख्यतः वयात आलेली कोवळी मुले मुली, वृद्धत्वाकडे झुकलेले तारुण्याच्या आठवणीत रमणारे आणि कौटुंबिक कलहामुळे किंवा वैवाहिक जीवनात लैंगिक अपेक्षा पूर्ण न झालेले लोक अडकले जातात.  क्षणभंगुर आनंदाचे सुख मिळविण्याच्या नादात आयुष्याचे सुख, समाधान, शांती गमावून बसतात. शरीर म्हंटले कि लैंगिक इच्छा मनात उफाळून येत राहणारच, हार्मोन्समध्ये बदल होत राहणारच पण हे जरी खरे असले तरी त्यावर नियंत्रण करणे हे आपल्या मनावर असते. नाहीतर त्याची परिणती आयुष्यच संपवण्यात होणार असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. सोशल मीडियाचा वापर करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळा. अनोळखी व्यक्तींशी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, संभाषण करू नये , छायाचित्र आणि व्हिडीओ पाठवू नये आणि सर्वात महत्वाचे लैंगिक ब्लॅकमेलिंग सारखा अनुभव आल्यास सहन न करता त्यास निडरपणे सामोरे जावे, त्याबद्दल कुठलेही भय न बाळगता त्यास प्रतिकार करत सेक्सटॉर्शनच्या विळख्यात अडकू नये. सोशल मीडियाचा सजगतेने वापर करणे हाच त्यावरचा उपाय आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट