सावरकर: दावे-प्रतिदावे आणि कटू सत्य...

सावरकर: दावे-प्रतिदावे आणि कटू सत्य
राहुल गांधींच्या टीकेनंतर सावरकांचे माफीनामे या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले. सावरकरांचा विषय आला की समर्थक विरोधकांमध्ये दावे प्रति दावे केले जातात. काळ्यापाण्याची शिक्षा आणि ब्रिटिश सरकारला दिलेला माफीनामा यांसारखे वादाचे विषय सतत चघळले जातात. राजकारणात तर अशा संवेदनशील विषयांची आवश्यकता लागतच असते. सावरकरांना मानणारा एक मोठा वर्ग देशात आहे. तो वर्ग सावरकरांच्या बाबतीत अतिसंवेदनशील आहे. याच संवेदनशीलतेचा आणि लोकांच्या भावनिकतेचा फायदा घेऊन राजकारण केले जाते. इतिहास हा भावनिक होण्याचा विषय नाही, तो समजून घेण्याचा विषय आहे, त्याचा डोळसपणे अभ्यास व्हायला हवा आणि त्याची चिकित्सा व्हायला हवी. 
सावरकरांच्या आयुष्याचा विचार केला तर तो खासकरून तीन भागात विभागता येईल. एक अंदमानपूर्व आणि दुसरे अंदमानोत्तर आणि तिसरे सुटकेनंतर. अंदमानपूर्व काळात सावरकर अखंड भारताचे पुरस्कर्ते असल्याचे दिसून येते कारण आपल्या १८५७चे स्वातंत्र्यसमर पुस्तकात सावरकरांनी हिंदू-मुस्लिम एकतेचे गोडवे गायले आहेत. नंतर त्यांचे अंदमानला कारावासात जाणे, तिथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होणे. मग तिथून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ब्रिटिशांना माफीनामे लिहिणे असा सावरकरांचा पुढचा प्रवास कदाचित त्यांच्या भूमिका बदलण्यास कारणीभूत ठरला असेल! सावरकरांनी ब्रिटिशांना जवळपास सहा माफीनामे दिल्याचे ऐतिहासिक सत्य आहे आणि त्याचे पुरावे ही उपलब्ध आहे. सावरकरांच्या माफीनाम्यावर बहुतांश लोकांचा किंबहुना काँग्रेसचा असा आक्षेप आहे की सावरकर जर देशासाठी लढत होते आणि त्यांचं कार्य विधायक होतं तर त्यांनी ब्रिटिशांची माफी का मागितली? मात्र दुसरा एक सावरकरवादी वर्ग आहे कि त्यांचा असा दावा आहे कि सावरकर यांचा तो सुटकेसाठीचा रणनीतीचा भाग आहे. १९३० साली लिहिलेल्या माफीनाम्यात सावरकर म्हणतात, I and my brother are perfectly willing to give a pledge of not participating in politics for a definite and reasonable period that the Government would indicate. त्यामुळे सावरकरवाद्यांचा दावा ब्रिटिशांना पत्रातून दिलेले आश्वासन आणि सुटकेनंतर स्वातंत्र्य लढ्यापासून घेतलेली फारकत स्वतः सावरकरच फोल ठरवतात. मात्र असे असेल तर सावरकरवादी लोक सावरकरांची प्रतिमा सार्वकालीन महान नेत्यांसारखी करायला पाहतात ते काही योग्य नाही आणि त्याचे कोणीही सुविचारी,सुशिक्षित लोक समर्थन करणार नाहीत. स्वातंत्र्याचा काळ इतका प्राचीन नाही आहे की इतिहासात काहीही घुसवून त्यात मोडतोड केली जाईल. आता काही सावरकरवादी मूर्ख महाभाग या माफीनाम्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या तहाशी करतात. ही खोडसाळ तुलना करताना ते हे विसरतात की महाराज औरंगजेबाच्या तावडीतून परत आल्यानंतर त्यांनी अवघ्या पाच वर्षांत तहात गमावलेले किल्ले त्यांच्याशीच लढून पुन्हा जिंकले. याउलट सावरकरांनी अंदमानातून स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर आपला मोर्चा ब्रिटिशविरोधी राजकारणाकडून समाजकारणाकडे वळवला. ते ब्रिटिशांविरुद्ध परत लढलेच नाहीत. त्यामुळे त्यांनी सावरकरांची तुलना शिवाजी महाराजांशी करताना किमान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी. 
सावरकर जेव्हा अंदमानातून सुटले तेव्हा जवळपास १४४ भारतीय कैदी असे होते ज्यांची शेवटपर्यंत सुटका झाली नाही. तुरुंगातच मरण आले. त्यांनी तर ब्रिटिशांसमोर मानाही तुकवल्या नव्हत्या तरी त्यांना वीर ही पदवी दिली गेली नाही. शहीद भगतसिंगाचेच उदाहरण घ्या..भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी ब्रिटिशांना कुठलीही याचिका करायला नकार दिला होता.. उलट हसत हसत ते फाशीवर गेले. म्हणजे जे हसत हसत फासावर गेले, मरेपर्यंत कारावास भोगत राहिले त्यांच्या पराक्रमाचे काय? उलट ते सगळे स्वातंत्र्यवीर आहेत, माफी मागून सुटका करून घेणारे नाही. 
    नंतरच्या काळात सावरकरांनी थेट द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला नसला तरी हिंदुराष्ट्राची संकल्पना मांडली आणि त्यातूनच द्विराष्ट्राचा सिद्धांत पुढं आला, त्यांनी इस्लाम धर्मावर यथेच्छ टीका केली. भारत हे एक राष्ट्र नसून हिंदू आणि मुस्लिम मुस्लिम अशी दोन राष्ट्रे आहेत असा द्विराष्ट्रवाद मांडला. हा द्विराष्ट्रवाद गांधी-नेहरू-पटेल-बोस या सगळ्यांनीच नाकारला होता. तो मान्य होता सावरकरांसारख्या धर्मांध मोहम्मद अली जिना यांना. जिना आणि सावरकर म्हणजे एकाच नाण्याचे दोन बाजू! 
सरदार पटेल सगळी संस्थानं खालसा करून भारतात विलीन करत होते तेव्हा सावरकर त्रावणकोरच्या राजाला पत्र लिहून सल्ला देतात की तुमचं हिंदू राज्य भारतात विलीन न करता तुम्ही स्वतंत्र रहा. सावरकरांचं हे वर्तन समाजात दुही माजविणारे होत हे स्पष्टचं दिसून येत.
 सावरकरांनी जातिव्यवस्थेविरोधात काम केल्याचे काही जण हाकाटी पेटवतात पण ते ही सत्य नाही. मुळात सावरकर हे कर्मठ हिंदुत्वादी होते..त्यांना दलितांच्या उद्धारात अजिबात रस नव्हता कारण जर त्यांना जातीनिर्मूलन करायचे होते तर त्यांनी दलितांना मंदिरात प्रवेश करता यावं यासाठी प्रयत्न केले असते पण तसे न करता दलितांसाठी स्वतंत्र मंदिर बांधण्यासाठी ते आग्रही होते. कारण दलितांच्या मंदिरात उच्चवर्णीय जाणार नाहीत हे सावरकरांना माहित होत. सावरकरांना खरंच जातिव्यवस्थेविरोधात लढायचं होतं तर त्यांनी दलितांना जिथे प्रवेश निषिद्ध होता तिथेच लढायला हवं होतं. बाबासाहेबांनी उच्चवर्णीय हिंदूंच्या त्रासाला कंटाळून धर्मांतराचा निर्णय घेतला. तेव्हा अनेक विद्वान ब्राह्मणांची बाबासाहेबांचे अभिनंदन केले मात्र सावरकरांनी  "बाटगा"  असा उल्लेख करत बाबासाहेबांचा अपमान केला. खरंतर दलितांचा बौद्धधम्म प्रवेश हा हजारो वर्षांपासून नाकारलेल्या हक्कांकडे जाणारा एक समतेचा मार्ग होता. त्यामुळे सावरकरांना खरंच दलितोद्धारात रस असता तर त्यांनी बाबासाहेबांची हेटाळणी न करता त्यांच्या या निर्णयाचं स्वागतंच केलं असतं.
 सावरकर यांच्यासंदर्भातला सर्वात मोठा वाद महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित आहे. गांधी हत्याकांडात नथुराम गोडसे जरी मुख्य आरोपी होता तरी हत्याकांडाच्या योजनेत सावरकर यांचाही सहभाग होता असा ठपका होता. त्या प्रकरणातून सावरकर जरी मुक्त झाले तरी नंतर नियुक्त करण्यात आलेल्या कपूर कमिशनच्या अहवालात त्यांना पूर्णपणे दोषमुक्त मानलं गेलं नाही. 
गांधी हत्येचे पाप हा सावरकर यांच्यावरील हा सर्वात मोठा डाग आहे. सावरकरांचा गांधी हत्येतला तथाकथित सहभाग आणि ब्रिटिशांकडे केलेली क्षमायाचना हे हिंदुत्ववाद्यांसाठी कटू व बोचरे सत्य आहे आणि ते राजकीय पातळीवर कायम उगाळले जात राहणार!

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट