अपोलो हॉस्पिटल्सचा ५ वर्षांत ५३ बाल-यकृत प्रत्यारोपणाचा टप्पा पार !
- by Reporter
- Oct 18, 2022
- 372 views
नवी मुंबई ( मंगेश फदाले ) नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटल्स हे पश्चिम भारतातील अग्रगण्य आणि बहु-वैशिष्ट्ये असलेल्या रुग्णालयाने आज ५३ जीवनदायी बाल-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण केल्याची घोषणा केली. रुग्णालयाने आजपर्यंत एकूण १७० यकृतासंबंधी प्रकरणे हाताळली आहेत, त्यापैकी ३४ मृत दात्यांच्या प्रत्यारोपणाशी संबंधित आणि १२ आंतरराष्ट्रीय प्रकरणे आहेत. पाच वर्षांत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आणि हा अपोलोच्या हाताळलेल्या प्रगत बालरोग यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमाच्या यशाचा पुरावा आहे. ज्यामुळे यकृताच्या शेवटच्या टप्प्यातील आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना जीवनदान मिळाले आहे. प्रत्यारोपण प्राप्तकर्त्यांचे वय ४ महिन्यांच्या अर्भकापासून ते मोठ्या मुलांपर्यंत असते ज्यामध्ये यकृत निकामी होण्यास कारणीभूत पित्तविषयक नलिकारोध आणि जन्मजात यकृत रोग यांचा समावेश होतो.
लहान मुलांच्या यकृत प्रत्यारोपणामध्ये आव्हानात्मक महामारीच्या काळात करण्यात आलेल्या प्रत्यारोपणाचा समावेश होता आणि हे शक्य झाले अनुभवी अशा बाल-यकृत प्रत्यारोपण टीम मुळे.
या टीमने प्रत्यारोपण प्राप्तकर्त्यांसाठी सुरक्षित आणि वेदनारहित प्रक्रिया पार पडावी यासाठी सर्व आवश्यक अशा जागतिक शिष्टाचाराचे पालन केले आहे.
अपोलो हॉस्पिटल्सने ३५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हेपॅटोबिलियरी पॅनक्रियाटिक प्रत्यारोपण शल्यचिकित्सक प्राध्यापक डॅरियस मिर्झा यांच्या वैद्यकीय नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात विद्यमान यकृत कार्यक्रमाचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. एच.पी.बी आणि यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम-अपोलो हॉस्पिटल्सच्या पश्चिमी क्षेत्राचे मुख्य सल्लागार म्हणून प्रा. डॅरियस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रा.डॅरियस हे मागील ४ वर्षांपासून अपोलो हॉस्पिटल्सशी संबंधित आहेत. त्यांनी अलीकडेच बर्मिंगहॅम चिल्ड्रन्स हॉस्पिटल यूके मधून निवृत्ती स्वीकारली आहे. जेथे ते हेपॅटो-पॅनक्रियाटो-बिलियरी प्रत्यारोपण शल्यचिकित्साचे प्राध्यापक होते आणि युरोपियन लिव्हर अँड इंटेस्टाइन ट्रान्सप्लांट असोसिएशनने त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी त्यांचा सत्कार केला आहे. प्रगत यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील त्यांचा जागतिक स्तरावरील दीर्घ अनुभव भारतातील यकृत रोगाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटल्स आणि बॉम्बे हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य कराराची घोषणा देखील या प्रसंगी झाली. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील रुग्ण मोठ्या प्रमाणात अपोलोच्या प्रगत यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमाचा लाभ घेतील.
दोन आघाडीच्या बहु-वैशिष्ट्ये असलेल्या रुग्णालयांमधील सामंजस्यामुळे अंतिम टप्प्यातील यकृत रोग असलेल्या रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाचे सकारात्मक परिणाम मिळतील. दोन्ही संस्था यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम तयार करण्यासाठी काम करणार आहेत. ज्यामध्ये सर्वोत्तम वैद्यकीय कौशल्य आणि यकृत प्रत्यारोपणाच्या उपचारामध्ये नवीनतम जागतिक दर्जाची तांत्रिक प्रगती पश्चिम भारतात आणली जाईल.
अपोलो हॉस्पिटल्स समूहाच्या कार्यकारी उपाध्यक्षा कु. प्रीथा रेड्डी म्हणाल्या, “अपोलोसाठी हा अभिमानाचा क्षण आहे कारण आम्ही पाच वर्षांत ५३ बाल यकृत प्रत्यारोपणाचा हा टप्पा गाठला आहे. अपोलो दरवर्षी भारतातील १५ % यकृत प्रत्यारोपण पार पाडते आणि आम्ही सॉलिड अवयव प्रत्यारोपणात अग्रेसर आहोत. ४,०५१ यकृतांच्या समावेशासह अपोलोला ३ दशकांहून अधिक अनुभव असून अपोलोने ५० हून अधिक देशांतील रुग्णांना सेवा प्रदान केली आहे.
प्रा.डॅरियस मिर्झा पुन्हा एकदा एच.पी.बी आणि यकृत प्रत्यारोपण युनिटच्या प्रमुखपदी आल्याने हे सिद्ध झाले आहे की, आम्ही सर्वोत्कृष्ट वैद्यकीय प्रतिभावंतांना प्राधान्य देत आहोत. बॉम्बे हॉस्पिटलच्या सहकार्याचेही मी स्वागत करते, या सामंजस्य करारामुळे आम्हाला आमच्या सेवा अनेक लोकांपर्यंत पोहोचविण्यात मदत होईल.”
अपोलो हॉस्पिटल्सच्या पश्चिम क्षेत्राचे प्रादेशिक सी.ई.ओ संतोष मराठे म्हणाले, “नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे जे.सी.आय मान्यताप्राप्त असून ५०० खाटांचे क्वाटरनरी केअर ( बहु वैशिष्ट्य असलेले ) रुग्णालय आहे. हे रुग्णालय यकृत, मूत्रपिंड आणि हृदय यांचा समावेश असलेला अतिशय यशस्वी प्रत्यारोपण कार्यक्रम चालवते. प्रत्यारोपणाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व कुशल आणि अनुभवी डॉक्टरांच्या बहु-कौशल्य असलेल्या टीमद्वारे केले जाते. या टीमने यकृत आणि एच.पी.बी मध्ये महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स इतर रुग्णालयांना अवयव पुनर्प्राप्ती केंद्रांमध्ये यकृत प्रत्यारोपण-प्रशिक्षण देते तसेच अवयव दान करण्यासाठी जनजागृती मोहिम आयोजित करते. वैद्यकीय टीमचा विस्तार झाल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. बॉम्बे हॉस्पिटलच्या सहकार्यामुळे यकृत निकामी होण्याची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची चांगली संधी मिळेल.”
अपोलो हॉस्पिटल्स पश्चिम क्षेत्राचे एच.पी.बी आणि यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. डॅरियस मिर्झा म्हणाले की, "जेव्हा मला अपोलो हॉस्पिटल्समध्ये यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम विकसित करण्याची संधी देण्यात आली, तेव्हा मला सर्व वयोगटातील आणि विविध जोखीम असलेल्या रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाच्या वैद्यकीय सेवेतील संपूर्ण श्रेणी ( परिपूर्णता ) प्रदान करण्याच्या माझ्या कौशल्याचा उपयोग करण्यासाठी हे सर्वात योग्य केंद्र वाटले.” “अपोलो हॉस्पिटल्स मधील बाल-यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमात आर्थिक-सहाय्य कार्यक्रम आणि स्वयंसेवी संस्थांसोबत केलेल्या सामंजस्य कराराद्वारे निधी उभारणीचे महत्त्वपूर्ण उपक्रमही आयोजित केले गेले आहेत. यामुळे समाजातील वंचित स्तरातील मुलांना त्यांच्या आजारासाठी सर्वोत्तम उपचार मिळतील. यामध्ये प्रत्यारोपणानंतरच्या औषधोपचाराचा देखील समावेश आहे.”
बॉम्बे हॉस्पिटल्स अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे वैद्यकीय सेवाचे संचालक डॉ. राजकुमार पाटील म्हणाले, "१९५२ मध्ये सुरू झालेले, बॉम्बे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर हे ७५० खाटा असलेले हॉस्पिटल आहे. हे रुग्णालय गेल्या ६ दशकांपासून सामान्य लोकांना निस्सीम आणि निःस्वार्थ वैद्यकीय सेवा पुरवते. बॉम्बे हॉस्पिटल यकृत प्रत्यारोपणाच्या कार्यक्रमाची योजना करत होते आणि आमच्याकडे नोंदणीकृत असलेल्या काही रुग्णांनी आधीच नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे उपचार घेतले आहेत. यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमासाठी अपोलो हॉस्पिटल्सला सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे आणि यामुळे आमच्या डॉक्टर आणि टीमची अंतर्गत क्षमता विकसित होईल, अशी आमची आशा आहे.”
रिपोर्टर