उल्हास नदी प्रदूषणास दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याना निलंबित करा.
पोस्टकार्ड व हस्ताक्षर अभियान करुन उल्हास नदी बचाओ समिती द्वारे मागणी.
- by Rameshwar Gawai
- Feb 12, 2021
- 898 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हास नदीचे वाढते प्रदुषण व जलपर्णी याला जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय अधिकारी यांचे तात्काळ निलंबन व्हावे या मागणीसाठी उल्हास नदी किनाऱ्यावरील गावे व शहरात स्वाक्षरी व पोस्ट कार्ड आंदोलन करण्यात आले आहे , दिवसेंदिवस उल्हास नदी प्रदुषित होत असतांना एकीकडे जबाबदार प्रशासकीय अधिकारी मुग गिळून गप्प बसलेत.
गाव वस्त्यांमधील सांडपाण्याबरोबर मोठमोठ्या उद्योग धंदे व कंपन्यांचे रसायन नदी पात्रता सोडण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ नदी बचाव करण्याचे सोडून दुषित करणाऱ्याना पाठिशी घालण्यासाठी सरकारी पगारावर काम करीत असल्याचा आरोप सर्वच स्तरातून होत आहे. उल्हास नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरील गाव व शहरी भागातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, गट विकास अधिकारी, आयुक्त, प्रांत अधिकारी, तहसीलदार, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व
जलसंपदा विभाग यांच्या बरोबर उल्हास नदी शी निगडित सर्वच अधिकाऱ्याना निलंबित करावे अशा आशयाचे पत्र व स्वाक्षऱ्या असलेले अर्ज पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पाठवावे अशी विनंती उल्हास नदी बचाव कृती समिती मार्फत उल्हास नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरील गाव व शहरी भागात राहणाऱ्या रहिवाशांना करण्यात आली आहे.
उल्हासनदीचे प्रदुषण येवढे वाढले आहे कि, उल्हासनदीचे पाणी पिण्या योग्य नाही हा निवाळा बऱ्याच प्रयोगशाळेने दिला असून नदीच्या बाजूला राहणाऱ्या गावातील लोकांमध्ये पोटाचे आजार व चमडीचे रोग यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
उल्हासनदी चे प्रदुषण थांबले नाही तर वालधुनी नदीचा जसा वालधुनी नाला झाला तसाच भविष्यात उल्हासनदी चा उल्हासनाला व्हायला वेळ लागणार नाही. सर्व नागरिकांना हात जोडून विनंती आहे कि, जास्तीत जास्त संख्येने या मोहिमेत सामील व्हा आणि आपल्या उमाई ला संपण्यापूर्वीच वाचवा अशी भावनिक मागणी करण्यात आली आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम