अंबरनाथ येथे उभारण्यात येणार मेडिकल हब वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख यांच्या बैठकीत मंजुरी

आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्याला यश

शासनाच्या २६ एकर जागेवर उभारण्यात येणार सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय

उल्हासनगर(प्रतिनिधी) : वैद्यकीय विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या रूपाने प्रत्यक्षात उतरणार आहे. अंबरनाथ पूर्व भागातील  सर्वे नं.१६६ येथील तब्बल २६ एकर शासकीय जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.  पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी हे शिवधनुष्य पेलण्याची प्रयत्न केला आहे.  बुधवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अंबरनाथ येथे सर्व सुविधांनी सुसज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास देशमुख यांनी हिरवा कंदील दिला असून वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक बाबींचा समावेश करून प्रस्ताव तयार करण्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाला  निर्देश देखील दिले आहेत. 

राज्य सरकारने जनतेच्या आरोग्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे ठाणे जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता आवश्यक जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत वैद्यकीय महाविद्यालय  स्थापन करण्यात आले नाही. सद्याच्या परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर आणि लगतच्या भागातील सामान्य जनतेला तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकेल असे सुसज्ज रुग्णालय नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती मध्ये मुंबई येथील के.इ.एम. अथवा जे. जे. रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. याकारणाने या भागातील सर्व सामान्य नागरिकांची व वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मुंबई सारखे सर्व सोयी - सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे अशी सातत्याने मागणी होत असल्याने आमदार डॉ. किणीकर यांनी हा प्रस्ताव तयार करून तो मार्गी लावला आहे. 

सद्याच्या परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विधार्थ्याना प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक अडचणीना सामोरे जावे लागत असते.  अंबरनाथ येथील सर्वे नं.१६६ येथील शासकीय जागेवर ठाणे जिल्ह्याकरिता “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय” (Govt. Medical and Hospital) उभारण्यात येणार असल्याने या विद्यार्थ्यांचा उज्जवल शैक्षणिक भविष्य मिळू शकेल असा विश्वास यावेळी आमदार डॉ. किणीकर यांनी व्यक्त केला.

या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्री. भूषण गगराणी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव श्री.सौरभ विजय, सह संचालक डॉ. चंदनवाले, नगरविकास विभागाचे सहसचिव श्री. संजय बानाईत, उपसचिव श्री.कैलाश बधान, उल्हासनगर प्रांत अधिकारी श्री.जयराज कारभारी, एमएमआरडीएचे वरिष्ठ नियोजक श्री.पाटील, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ, सहायक नगररचनाकार श्री.राजेंद्र हेले आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट