अंबरनाथ येथिल भवानी ज्वेलर्स वर हल्ला करणाऱ्या त्रिकुटास मुद्देमालासह अटक .
- by Rameshwar Gawai
- Jan 28, 2021
- 541 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : पंधरा दिवसापुर्वी भवानी ज्वेलर्स,सर्वादय नगर अंबरनाथ येथे दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ४ इसमानीं मोटरसायकलवर येऊन दुकानाचे मालक व त्यांचे साथीदार यांचेवर पिस्तुलाने फायरिंग करीत तसेच चाकुने वार करीत २० ते २५ तोळे सोन्याची जबरी चोरी करुन पसार झाले होते.त्यात ज्वेलर्स दुकानाचे मालक भैरवसिंग राजपुत जखमी झाले होते . तेव्हा त्याच्या फिर्यादीवरुन अंबरनाथ पोलीस स्टेशनला गु.र.नं ५४/२०२१ भा.द.वी कलम ३९४,३९७,३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५,२७ सह महा.पोलीस कायदा कलम ३५(१)(अ),१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे कल्याण पुर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते,अंबरनाथ विभागाचे सहा पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते.
वरिष्ठांच्या सुचनाच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि पो.नि.(गुन्हे) संजय बेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरणाचे अधिकारी पोलीस उप निरिक्षक हर्षल राजपुत,प्रविण खोचरे,उल्हास जाधव यांच्या पथकाने अतिशय शिताफीने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे कौशल्यपुर्वक तपास करुन मोनु विश्वकर्मा वय.२२, धिरज सर्वगोडे वय.२३, दिवेश सिंग वय.२५ या तिघांना शिताफीने अटक करुन त्यांचे कडुन एक मंगळसुत्र ,४ चैन अशा एकुण पाच तोळे सोने चार मोबाईल ऐवढा मुद्देमाल हस्तगत केला आहे.अटक केलेल्या आरोपी पैकी दिवेश सिंग या गुन्हातील मुख्य फरार आरोपी याचा भाऊ असुन दिवेशने मुख्य आरोपीला फरार करण्यात मदत केली असल्याचे बोलले जात असुन मुख्य आरोपीस लवकरच अटक करण्यात येईल असे पोलीसांकडुन खात्रीलायक रित्या सांगितले जात आहे.वरिल गुन्हाच्या तपासा दरम्यान भा.द.वि कलम २०१, २१२ वाढविण्यात आले आहे.
पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपींना अटक केल्याबद्दल नागरिकां मधुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम