अदानी इलेक्ट्रिसिटीच्या विरोधात माकप आमदार विनोद निकोले यांचे जोरदार आंदोलन
- by Reporter
- Jan 12, 2021
- 1772 views
डहाणू. (विशेष प्रतिनिधी) – अदानी डहाणू थर्मल पॉवर स्टेशन वर स्थानिक जनतेच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, ज्यावेळी सदरहू प्रकल्प तयार करण्यात आला होता त्यावेळी स्थानिक जनतेच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, आज २७ वर्षे उलटून देखील मागण्यांची पूर्तता झालेली नाही. येथील व्यवस्थापन झोपलेल्या अवस्थेत असून त्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसले आहेत. त्यांना खडबडून जागे करण्याच्या अनुषंगाने हे पाऊल आम्हाला जनतेच्या व कामगारांच्या वतीने उचलावे लागत आहे. याप्रसंगी हजारोंच्या संख्येने जनता रस्तावर उतरून निकोले साहब आगे बढो, हम तुमारे साथ है, कोण बोलतो देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही, अदानी मॅनेजमेंट मुर्दाबाद..! मुर्दाबाद..!, वेतन आमचं हक्काचं, नाही कोणाच बापाचं, मजदूर एकता झिंदाबाद..! झिंदाबाद..!, या अदानी मॅनेजमेंट चे करायचे काय ? खालती डोकं, वरती पाय अशा जोरदार घोषणाबाजी अदानी इलेक्ट्रिसिटी च्या विरोधात भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे डहाणु विधानसभा आमदार कॉ. विनोद निकाले यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात देण्यात आल्या. यावेळी १) कंत्राटी कामगारांच्या मागण्या त्वरित मान्य करणे. २) स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार देणे. ३) स्थानिक शेतकरी - बागायतदारांना अदानीच्या प्रदूषणापासून मुक्त करणे. ४) डहाणूतील १५ कि.मी च्या परिसरातील लोकांना मोफत वीज देणे आदी मागण्यां संदर्भात कैनाड विभाग डहाणूच्या वतीने अदानी डहाणू थर्मल पॉवर स्टेशनवर स्थानिक जनतेच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता. तसेच अदानी मधील कामगारांच्या मागण्यांच्या संदर्भात आम्हाला सकारात्मक न्याय मिळाला नाही तर आम्ही कामगार आयुक्त्यांकडे जाऊ असा इशारा आ. निकोले यांनी दिला आहे.
या मोर्चामध्ये कैनाड विभाग सेक्रेटरी कॉ. चंद्रकांत गोरखाना, कॉ. धनेश अक्रे, कॉ. लता घोरखाना, कॉ. विजय वाघात, कॉ. बच्चु वाघात, कॉ. सुरेश जाधव, कॉ. हरिचंद्र गहला, कॉ. राजेश दळवी, कॉ. कमलेश राबड, कॉ. भरत गोरवाला, कॉ. सुरेश मोरे, कॉ. डॉ. आदित्य अहिरे, पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते आदी सहभागी होते.
रिपोर्टर