गरजूवंत विद्यार्थ्यांना विद्यार्यांनीच दिला मदतीचा हातऑनलाईन शिक्षणासाठी टॅब्ज व स्मार्टफोनकरिता जमवले 4 लाख
- by Reporter
- Jan 02, 2021
- 690 views
ठाणे दि २(प्रतिनिधी): कोरोना महामारीमुळे शालेय शिक्षण विस्कळीत झाले आहे. मात्र अनेक शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण देणे पसंत केले आहे. परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थांसाठी ऑनलाईन शिक्षण अडचणीचे ठरले आहे . याच पार्श्वभूमीवर अशा गरजुवंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळायला हवे तसेच त्यांना टॅब व स्मार्टफोन उपलब्ध व्हावे या उद्देशाने ठाणे येथील युरो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ४ लाख रुपये देणगी जमा केली असून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या व्हर्च्युअल शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या टॅब आणि स्मार्टफोनची खरेदी करण्यात येणार आहे.
सोबतच द लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या साथीने विदर्भ आणि मराठवाडा येथील विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. ज्यांच्या शिक्षणात टाळेबंदीमुळे अडचण निर्माण झाली, ज्यांना व्हर्च्युअल शिक्षणाला लागणारे टॅब आणि स्मार्टफोन परवडत नाहीत अशा विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना युरोस्कूल ठाणे येथील प्राचार्या ज्योत्स्ना मायादास म्हणाल्या की,“यावर्षी अचानक निर्माण झालेल्या महामारीमुळे समाजातील बहुसंख्य व्यक्तींना प्रचंड तणावाचा सामना करावा लागला. आपल्या अवतीभवती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालके मोठ्या मेहनतीने शिक्षण घेत असतात. त्यांच्या शैक्षणिक प्रवासात महासाथीमुळे अडचण निर्माण झाली. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाचा लाभ पोहोचणे आवश्यक आहे याबाबतीत शाळेचे दुमत नाही. लाईट ऑफ द लाईफ ट्रस्टने या दिशेने केलेली कामगिरी अद्वितीय आहे. आम्हाला आमचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा; ज्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले त्यांचा मोठा अभिमान वाटतो. मी एनजीओचे आभार मानते आणि ज्या विद्यार्थ्यांनी मनापासून यामध्ये सहभाग घेतला, तसेच अभियानात योगदान दिले त्यांना शुभेच्छा देते”, या शब्दांत त्यांनी मनोगत व्यक्त केले.
रिपोर्टर