स्मशानभूमीत जळाऊ लाकडे नसल्यामुळे मृतदेहाची हेळसांड..एका स्मशानभूमीतुन दुसऱ्या स्मशानभूमीत नेण्याची नातेवाईकांवर पाळी.

उल्हासनगर(प्रतिनिधी) : हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या एका विवाहितेचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आला होता.मात्र तिथे तात्काळ जळणारे लहान आकाराची लाकडेच नसल्याने या मृतदेहाला दुसऱ्या स्मशानभूमी मध्ये नेण्याची वेळ नातलगांवर आली.ही घटना बुधवारच्या रात्री उल्हासनगरात घडली.

उल्हासनगर कॅम्प  ४ मधील संभाजी चौक परिसरात राहणाऱ्या ज्योती दिनेश भवार या ४० वर्षीय विवाहितेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.अवघ्या दिडशे ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या व्हीनस चौका जवळील स्मशानभूमीत नातलग मित्रमंडळी,शेजारी यांनी ज्योती यांचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेला.तिथे मोठमोठे लाकडाचे ओंडके होते.लवकर जळणारे लहान लाकडे नसल्याने त्यांना कॅम्प  ५ मधील स्मशानभूमीत मृतदेह नेण्यास सांगण्यात आले.नागरिकांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला.पण शेवटी लाकडेच नसल्याने त्यांना ज्योती यांचा मृतदेह कॅंप - ५ कैलास कॉलनी मधील स्मशानभूमीमध्ये नेण्याची वेळ आली.तिथे रात्री ज्योती यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

या अंतिम  यात्रेत व अंतिम संस्कार करते वेळी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विजय कांबळे यांनी कॅंप  ४ च्या स्मशान भूमीत लाकडे नसल्याने एका महिलेच्या मृतदेह कॅंप  ५ च्या स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कारासाठी नेले.ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यावर एकच खळबळ उडाली.आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजा रिजवानी यांना सूचना दिल्या.रिजवानी यांनी फोनाफोनी केली. अनेक राजकीय मंडळींचे फोन त्यांना आले.रिजवानी यांनी स्मशान भूमीचे ट्रस्टी हरेश कृष्णानी यांना फोन करून विचारणा केली.तेंव्हा लहान लाकडे संपल्याचा प्रकार समोर आला. तर स्मशान भूमीत काम करणारे कर्मचारी वेळेवर माहिती देत नसल्यामुळे हा प्रकार घडला. दरम्यान सकाळी प्रचंड प्रमाणात लहान लाकडांचा साठा उपलब्ध केला आहे.असे कृष्णानी यांनी सांगितले आहे .

संबंधित पोस्ट