आणि गरिबांची दिवाळी गोड झाली.....

ठाणे(प्रतिनिधी)संपूर्ण जगभर कोरोनाच्या राक्षसी आणि स्वैर संचाराने  जनता भयभीत असतांना गरीब कष्टकरी आदिवासी समाज मनाने पुरता खचलेला दिसून येतो. सर्व प्रकारचे  आर्थिक स्रोत बंद झाल्याने उद्याच्या जेवणाची चिंता असणाऱ्या या समाजाला यावर्षी दिवाळी सण साजरा करण्याची थोडी देखील आशा उरली नाही. असे असतांना या गरीब कष्टकरी समाजाच्या वेदना जाणून त्यांची दिवाळी गोड करण्याचा एक प्रयत्न रोटरी क्लब ऑफ मुंबई मिडवेस्ट  व आदिवासी उन्नती मंडळ मुंबई या संस्थेच्या वतीने आज शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील वाऱ्याचापाडा व साखरवाडी या आदिवासी वाडीवर करण्यात आला. 

सुमारे ८० गरीब व आदिवासी कुटुंबियांना जीवनावश्यक किराणा वस्तूंचे वाटप आज करण्यात आले. ज्यात दिवाळी फराळ तयार करण्यासाठीचे साहित्यही समाविष्ट होते. या वस्तूंच्या वाटपानंतर या गरीब लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. यावेळी सर्व कुटुंबियांच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होणार म्हणून आनंदाश्रू पहावयास मिळाले.

या प्रसंगी लेनाड ग्रामपंचायत सरपंच प्रतिक्षा मेंगाळ, ग्रा पं सदस्य विठ्ठल शिवारे, शा व्य समिती अध्यक्ष रघुनाथ वाख,  डॉ हरिश्चंद्र भोईर सर, भगवान वरकुटे सर, चंद्रकांत पाटील सर , वाऱ्याचापाडा शाळेतील शिक्षक प्रमोद पाटोळे व शर्मिला पाटोळे व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रम सोशल डिस्टनसिंग चे पालन करून करण्यात आला.

संबंधित पोस्ट