दिवाळी आधी दिव्यांग निधी मिळावा अन्यथा ठिय्या आंदोलन,विविध दिव्यांग संघटनांचा उल्हासनगर महापालिकेला इशारा .
- by Rameshwar Gawai
- Oct 27, 2020
- 830 views
उल्हासनगर(प्रतिनिधी): शहरातील विविध दिव्यांग संघटनांनी मागणी करूनही दिव्यांग व्यक्तींना उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे अनुदान वाटप करण्यात आलेले नाही आधीच कोरोनाच्या संकटामुळे दिव्यांग बांधवांवर बिकट परिस्थिती आली आहे त्यामुळे कमीतकमी दिवाळीच्या आधी अनुदान मिळावे अशी त्यांची मागणी आहे, जर लवकरात लवकर हे अनुदान मिळाले नाही तर येत्या २ नोव्हेंबर रोजी महापालिका मुख्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिव्यांगांच्या विविध संघटनांनी दिला आहे .
उल्हासनगर महापालिका क्षेत्रात जवळपास १२०० दिव्यांग व्यक्ती राहतात, महाराष्ट्र शासनाच्या २०१८ च्या शासन नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे एकूण अर्थसंकल्पच्या ५ टक्के निधी हा दिव्यांग व्यक्तींना अनुदान करण्यात यावेत असे आदेश आहेत . उल्हासनगर महानगरपालिकेने देखील या आदेशाचे पालन करीत जवळपास १२०० व्यक्तींना दरवर्षी प्रति व्यक्ती १२ हजार रुपये अनुदान वाटप केले आहे , मात्र या वर्षी पाठपुरावा करूनही अद्याप अनुदान वाटप झालेले नाही, देशातल्या सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीच्या पूर्वी हे अनुदान वाटप झाले पाहिजे अशी मागणी दिव्यांग संघर्ष समिती, अपंग विकास महासंघ , भाजप दिव्यांग सेल, टीओके दिव्यांग सेल या चार विविध संघटनांनी केली आहे .
या शिवाय महापालिका मुख्यालयाच्या आवारात दिव्यांगांच्या तीन चाकी सायकल तसेच स्कुटर पार्किंगची व्यवस्था अत्यंत त्रासदायक आहेत, मुख्यालयाच्या गेट पासून पार्किंगचे अंतर जास्त असून स्वतंत्र व्यवस्था करणे देखिल आवश्यक आहे . दिव्यांगांना मदत करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात यावा, ३ डिसेंबरला महापालिके द्वारे दिव्यांग दिन साजरा करण्यात यावा , महापालिका कार्यक्षेत्रातील प्रत्येक सार्वजनिक स्वच्छतागृहा मध्ये रॅम्पची सुविधा करण्यात यावी अश्या विविध मागण्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत .
जर लवकरात लवकर दिव्यांग अनुदान मिळाले नाही तर महापालिकेच्या मुख्यालया समोर २ नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा या लेखी निवेदनात महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे .
प्रतिक्रिया . सचिन सावंत ( अध्यक्ष , दिव्यांग संघर्ष समिती )
उल्हासनगर महापालिके जवळ असलेल्या कल्याण - डोंबिवली महापालिके कडून २६ हजार प्रतिव्यक्ती , तसेच अंबरनाथ व बदलापूर या नगरपालिका असून सुद्धा १८ हजार प्रतिव्यक्ती अनुदान देण्यात येते मात्र उल्हासनगर महापालिके द्वारे केवळ १२ हजार अनुदान देण्यात येते , हे अनुदान देखील आम्हाला या वर्षी वेळेवर मिळत नाही
विकास चव्हाण ( मुख्य लेखाधिकारी , उल्हासनगर महानगरपालिका )
दिव्यांगांना महापालिके तर्फे सर्वोतोपरी सहकार्य केले जाते मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे मालमत्ता कर वसुली झालेली नाही , एवढेच नव्हे तर कोरोनाची ३ कोटीची बिले थकीत आहेत, शासनाचे अनुदान मिळाले नाही यामुळे महापालिका कर्मचारी व अधिकारी यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे . त्यामुळे हे अनुदान मिळण्यास विलंब लागत आहे .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम