
शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रधान पाटील यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र , प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश.
- by Rameshwar Gawai
- Oct 13, 2020
- 886 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर महानगरपालिके मध्ये सन २००७ ते २०१७ पर्यंत शिवसेनेचे सलग दहा वर्षे नगरसेवक राहिलेले कट्टर शिवसैनिक आनंद दिघे यांचे कडवट समर्थक प्रधान धर्माजी पाटील यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करित आपल्या असंख्य कार्यकर्त्यांबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते,शेतकऱ्या करिता आंदोलने करणारे कणखर नेतृत्व महाविकास आघाडीचे ( राज्यमंत्री ) आमदार बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केेला असून त्यांची उल्हासनगर शहर अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
सन २०१७ मध्ये पार पडलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पारिवारिक वादामुळे त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती.परिवारा सोबतच्या संघर्षात अखेर शिवसेनेने त्यांची उमेदवारी डावलून त्यांना तिकीट नाकारत त्यांच्या परिवारातील
सदस्याला उमेदवारी दिली.त्यामुळे पक्षा सोबत निष्ठावंत राहिल्याचे पक्षाने आपल्याला हे फळ दिले अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. तेेव्हापासून ते शिवसेनेवर नाराज होते.सलग दहा वर्षे नगरसेवक राहिलेलेे प्रधान पाटील हे शिवसेनेचे आक्रमक नगरसेवक राहिलेे असून त्यांना महानगरपालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे.
त्यांची प्रहार जनशक्ती पक्षात उल्हासनगर शहराध्यक्ष या पदावर नियुक्ती झाल्यामुळे त्यांंच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळणार असून पक्षाची ताकद वाढण्यास मोलाची मदत होणार आहे.असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲड.स्वप्निल पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख हितेश जाधव, पक्षाचे प्रवक्ते ॲड.मनोज टेकाडे, ॲड.अजय तापकीर व प्रधान पाटील यांचे खंदे समर्थक आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम