२५ सप्टेंबर २०२० माथाडी कामगारांचा ऑनलाईन मेळावा संपन्न

नवीमुंबई  : बाळासाहेब ठाकरे  आणि अण्णासाहेब पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सशक्त व समर्थ महाराष्ट्र करण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांनी अण्णासाहेबांच्या जयंतीनिमित्त ध्वनी चित्रफितीद्वारे केले. ते माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार  सहकारी पतपेढी मर्या. व अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 'माथाडी भवन' तुर्भे, नवीमुंबई येथे आयोजित केलेल्या  ऑनलाइन मेळाव्यात बोलत होते. ते पुढे असे म्हणाले कि, गेल्या वर्षी संघटनेच्या सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमात हजारो माथाडी कामगारांच्या मेळाव्याला मी उपस्थित होतो, त्यावेळी संघटनेच्या ज्या-ज्या समस्या आहेत त्या माझ्यासमोर आहेत. या सर्व समस्यांची मुख्यमंत्री म्हणून मी सोडवणूक करणार आहेच. तसेच मराठा आरक्षण हि न्यायालयीन लढाई जिंकण्या साठी सरकारचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आणि हि लढाई आम्ही जिंकणारच. आम्ही सरकारद्वारे माझे कुटुंब माझी जबादारी हि योजना जाहीर केलेली आहे. ती साकार करण्याची जबाबदारी संघटीतपणे स्वीकारली पाहिजे असेही आपल्या भाषणाद्वारे मुख्यमंत्री यांनी सूचित केले.


राज्याचे सहकार  मंत्री ना.बाळासाहेब पाटील यांनी या ऑनलाईन मेळाव्यात बोलताना असे सांगितले कि, स्व.अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांची चळवळ अथक संघर्ष करून वाढविली आणि माथाडी कायद्याची निर्मिती केली. तसेच माथाडी कामगारांना सन्मानही मिळवून दिला, याची जाणीव मला आहे. आता मी माथाडी कामगारांच्या गहन समस्या ऐकलेल्या आहेत, या सर्व समस्या शासनासमोर मांडून आमचे मंत्रीमंडळ संयुक्तपणे त्यावर निश्चित तोडगा काढेल अशी ग्वाही मी सरकारद्वारे देतो.

तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या ऑनलाईन मेळाव्यात बोलताना सांगितले कि, अण्णासाहेबांनी माथाडी कामगार चळवळीला व मराठा समाजाला प्रचंड मोठे नेतृत्व दिले. त्यांनी अनेक कार्यकर्ते, नेते तयार केले. अठरापगड जातींना एकत्र करून असंघटीत माथाडी कामगारांना संघटीत केले व ऐतिहासिक असा माथाडी कायदा निर्माण करून माथाडी कामगारांना सन्मान मिळवून दिला. हा कायदा अधिक सुरक्षित होण्यासाठी व त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे कशी होईल याची आपणा सर्वांना दक्षता घ्यावी लागेल. या कायद्याचा आधार घेऊन माथाडी कामगारांना आणि माथाडी चळवळीला बदनाम करणाऱ्या माफियांना जेरबंद करावेच लागेल. ते पुढे असेही म्हणाले कि, बाजार समिती नियमन मुक्तीचा माथाडी कामगारांवर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही, तसेच शेतकरी व कामगारांचा फायदाच होणार आहे अशी तरतूदही या कायद्यात आहे. मराठा आंदोलनाचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी पहिले बलिदान दिले व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष केला. आज आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे हे न्याय प्रविष्ट प्रकरण आहे. तरीही न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आपण अथक प्रयत्न केले पाहिजेत आणि ज्या दिवशी हि लढाई आपण जिंकू तीच खरी अण्णासाहेबांना अर्पण केलेली आदरांजली असेल. 

राज्याचे माजी मंत्री,आमदार गणेश नाईक म्हणाले कि, कष्टकरी कामगारांना 'माथाडी' हे सन्मानाचे नाव मिळवून देण्याचे काम अण्णासाहेब पाटील यांनी केले. ज्या-ज्या वेळेस माथाडी कामगारांसमोर प्रश्न निर्माण होतील त्या-त्या वेळी मी माथाडी कामगारांच्या पाठीशी उभा राहून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करेन. आजपर्यंत आपण अनेक संकटांचा सामना केला आहे. यापुढेही येणाऱ्या संकटांची सोडवणूक करण्यासाठी आपण सगळे भव्य एकजुटीने प्रयत्न करूया असे आवाहनही त्यांनी केले.

तर आपल्या स्वागत व प्रास्ताविक भाषणात नरेंद्र अण्णासाहेब  पाटील म्हणाले, सरकारने बाजार समित्यांचे नियमन मुक्त करण्याचा आदेश काढला पण अजूनही शेतकऱ्यांना न्याय कसा मिळत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून माथाडी कामगार हे शेतकऱ्यांचीच मुले आहेत. बाजार समित्या टिकल्या पाहिजेत आणि बाजार समित्याद्वारे व्यवहार सुरु राहिले पाहिजेत. पुढे ते असे म्हणाले कि, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कामगारांचा कोरोना काळात मृत्यू झाल्यास त्याला विमा सुरक्षा कवच म्हणून ५० लाख रुपये मिळावेत अशी मागणी त्यानी या मेळाव्यात केली. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे मी अध्यक्ष पदाच्या कालावधीत कोट्यावधी रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळवून देऊन अनेक मराठा तरुणांना उद्योजक केले. अण्णासाहेबांच्या काळात हे महामंडळ असते तर मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासली नसती. अण्णासाहेबानी आयुष्यात कधीही तडजोड केली नाही ते सतत संघर्ष करीत राहिले. तडजोड केली असती तर अण्णासाहेबानी आपले आयुष्य संपवले नसते. शेवटी त्यांनी मुख्यमंत्री निधीतून माथाडी कामगारांच्या हॉस्पिटलला १० कोटी रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी केली. माथाडी पतपेढी व माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न देखील मेळाव्यात मांडले.

राज्याचे माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे त्यांच्या भाषणात असे म्हणाले कि, केंद्र सरकार अनेक वेळा नियम बदलते आणि त्यानुसार राज्य सरकारचेहि नियम बदलले जातात त्याचा परिणाम होतो कायदा शेतकऱ्यांसाठी जरूर असावा पण त्याच बरोबर व्यवहार सुरळीत चालण्यासाठी इतर घटकांचीही आवश्यकता असते याचीही केंद्र सरकारने दाखल घेतली पाहिजे. आता बदललेल्या कायद्यातून भांडवलशाही वाढू नये यासाठी आपण सर्वांनी संघटीत प्रयत्न केले पाहिजेत. पुढे ते असे म्हणाले कि, एकजुटीने संघर्ष आणि लढा देऊन आपण सर्वांनी माथाडी चळवळ जिवंत ठेव्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अण्णासाहेब पाटील यांनी उभी केलेली ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ अभेद्य ठेवणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरणार आहे केंद्र व राज्य सरकारकडून कामगारांचे प्रश्न सोडविण्यास सर्व पक्षातील नेत्यांनी सहकार्य करावे असे ते म्हणाले.  

युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप असे म्हणाले कि, माथाडी हा कामगार चळवळीचा केंद्रबिंदू आहे. इतर चळवळी दिशाहीन झाल्या पण हि चळवळ आपले अस्तित्व अजूनही टिकवून आहे या चळवळीचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी गडी, हमाल म्हणून संबोधले जाणाऱ्या कामगारांना माथाडी कामगार हि सन्मानाची पदवी मिळवून दिली. तसेच ऐतिहासिक माथाडी कायद्याची निर्मिती केली. एकजुटीने संघर्ष करून कायद्याचे अस्तित्व कायम स्वरूपी टिकवून ठेवले पाहिजे हीच खरी आजच्या जयंती निमित्त त्यांना वाहिलेली श्रद्धांजली होय.

या मेळाव्यात ८ माथाडी कामगारांना माथाडी भूषण हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युनियनचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले तर आभार अध्यक्ष एकनाथ जाधव यांनी मानले. या ऑनलाईन मेळाव्यास आमदार प्रसादजी लाड, अशोक गावडे, बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, सचिव अनिल चव्हाण, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे एमडी अनिल पाटील, माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील, माथाडी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.हणमंतराव अण्णासाहेब पाटील, माथाडी युनियनचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, रविकांत पाटील, दिलीप खोंड, खजिनदार गुंगा पाटील, कायदेशीर सल्लागार सौ. भारतीताई पाटील आदी उपस्थित होते.

कोविड -१९ संबंधित राज्य सरकारचे व नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निर्देशानुसारच्या सर्व नियमांचे उदा. सामाजिक अंतर, मास्क व हेड शिल्ड लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. टेम्प्रेचर व ऑक्सिजन व पल्स रेट प्रवेशद्वारावर तपासून मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थित हा ऑनलाईन समारंभ महाराष्ट्रातील हजारो माथाडी कामगार, त्यांचे कुटुंबीय व जनतेने युट्यूब व फेसबुक लाईव्हद्वारे पहिला.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट