शहापुर तालुक्यात 24 सप्टेंबर पासून 7 दिवसांचा जनता कर्फ्यु
- by Mahesh dhanke
- Sep 22, 2020
- 1073 views
शहापुर(महेश धानके)शहापुर तालुक्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातील गाव खेडयांनाही कोरोनाने विळखा घातल्याने शहापुरात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडयांत दिवसेंदवस वाढ होत आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण ही प्रशासनासमोर डोकेदुखी बनली असुन अनलाँक नंतर बाजारपेठांत उसळलेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णसंख्येत झालेली वाढ लक्षात घेता व कोरोनाची साखळी रोखण्याच्या दृष्टीने शहापुर तालुक्यात पुन्हा एकदा आठवडा भराचा जनता कर्फ्यु घोषित करण्यात आला आहे. शहापुरचे आमदार दौलत दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली शेतकी भवनात झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी, प्रशासकीय यंञणा व व्यापारी यांच्या उपस्थितीत शहापुरातील जनतेने सात दिवसांच्या जनता कर्फ्युमध्ये स्वयंस्फुर्तीने सहभागी होण्याचे आवाहन आमदार दरोडा यांनी केले आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीकडुन तालुक्यात आठवडयाच्या दर शुक्रवारी एक दिवसाचा जनता कर्फ्यु लागु करण्यात आला. समितीच्या या निर्णयाने एरव्ही अँक्टिव्ह असणारा शहापुरातील कोरोना शुक्रवारच्या जनता कर्फ्युमध्ये अँक्टिव्ह होत नसल्याचा आरोप सोशल मिडीयातुन होत होता. या एकदिवसीय जनता कर्फ्युला संमिश्र प्रतिसादही मिळाला. परंतु एका दिवसाच्या जनता कर्फ्युमुळे संक्रमण रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकल्याने शहापुरचे आमदार दौलत दरोडा यांनी सोमवारी शहापुरातील शेतकी भवनात सर्वपक्षीय पदाधिकारी, शासकीय यंञणा, व्यापारी व पञकार यांचेशी चर्चा केली. यावेळी दरोडा यांनी प्रशासनाला येणाऱ्या अडचणी, कोव्हीड सेंटरमधील बेडची अपुरी संख्या, कोरंन्टाईन सेंटरला दाखल करण्यात पुरेशी व्यवस्था नसणे, तपासणी नमुने कमी प्रमाणात घेणे, अँन्टीजन टेस्ट किटचा अपुरा पुरवठा यासह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच शहापुरात कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी नागरीकांनी 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या सात दिवसांच्या जनता कर्फ्युमध्ये स्वयंस्फुर्तीने सहभागी होण्याचे आवाहन आमदार दरोडा यांनी केले असुन जनता कर्फ्यु काळात नागरीक घरात राहिल्यास माझे कुटुंब, माझी जबाबदारी या राज्य सरकारच्या अभियानालाही मदत होणार आहे . दरम्यान शहापुरात गेल्या सहा महिन्यात कोरोनाने धुमाकुळ घातला असुन शहरी पटयासह ग्रामीण भागातील गाव खेडयांतही शिरकाव केल्याने शहापुरात कोरोनाचे रूग्ण मोठया प्रमाणात वाढले आहेत. शहापुरात कोरोना बाधितांची एकुण संख्या 2605 झाली असुन नगरपंचायत हद्दीत 316 व शहापुर ग्रामीण मध्ये 2289 रुग्ण कोरोनाने बाधित झाले आहेत. रविवारपर्यंत शहापुरात 79 लोकांचा कोरोनाने मृत्यु झाला असुन 1917 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे तर 609 रुग्ण उपचाराधिन आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम