...आणि उत्तर प्रदेशचा फरार खुनी शहापुर पोलिसांच्या हाती

शहापुर (महेश धानके) : शहापुर तालुक्यातील मध्य रेल्वेचे स्टेशन असलेल्या खर्डीजवळ अत्यवस्थ अवस्थेत सापडलेल्या अनोळखी इसमास वैद्यकीय उपचार करतानाच त्याच्या ओळखीसाठी घेतलेल्या त्याच्या आधार-कार्डावरील माहितीवरून शहापूर पोलिसांच्या हाती  अमितचंद्र ऊर्फ रोशन सुरेश बिंद हा २६ वर्षीय युवक उत्तर प्रदेश मधून खून करून फरार असलेला खुनी हाती लागला  सदर फरार खुनी इसमास उत्तर प्रदेश पोलिसांनी आज ताब्यात घेतले.

दोन दिवसांपूर्वी खर्डीजवळ अर्थात  मुंबई - नाशिक  महामार्गावर एक अनोळखी व्यक्ती अत्यवस्थ अवस्थेत आढळून आल्याने त्यास खर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे हलवण्यात आले. पण तब्येत आणखी बिघडल्याने त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती रुग्णालय कळवा येथे पाठवण्यात आले. तेथे दीड दिवस उपचार केल्यावर प्रकृतीत सुधारणा झाल्याने शहापूर येथे पाठवण्यात आले.

सदर व्यक्ती बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने शहापूर पोलिसांनी त्याच्या बॅगेत सापडलेल्या आधारकार्डावरील माहितीनुसार त्याचा तपास काढायला सुरुवात केली. आधारकार्डावरील त्याचे नाव अमितचंद्र उर्फ रोशन सुरेश बिंद, राहणार कसेरा, तालुका पोखरा, जिल्हा गाझीपूर, उत्तर प्रदेश असे नमूद असल्याने त्याची चौकशी केली असता त्याच्यावर उत्तर प्रदेश राज्यातील जमानिया पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा नोंद असून तो फरार असल्याचे कळले.याबाबत शहापुर पोलिसांकडून माहिती मिळताच संबंधित पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी त्यास ताब्यात घेण्यासाठी तात्काळ विमानाने शहापुरकडे रवाना झाले.

आरोपीस ताब्यात घेण्यासाठी आलेल्या जमानिया पोलीस स्टेशनमधील पोलिसांकडे दैनिक आदर्श महाराष्ट्र ने  चौकशी केली असता, हा २६ वर्षीय इसम दारूच्या दुकानात दारू घेण्यासाठी गेला असता त्यास दारू देण्यास नकार देणाऱ्या युवकाचा त् खून करून तो  फरार झाल्याचे समजले. जमानिया पोलिसांनी या आरोपीस शहापूर पोलीस स्टेशनमधून आपल्या ताब्यात घेऊन उद्या शहापूर कोर्टात प्रवासी वॉरंटसाठी हजर करून पुढील कारवाईसाठी जमानियाला घेऊन जाणार असल्याचे समजले.

दरम्यान सदरची कामगिरी ठाणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक श्री डॉ शिवाजी राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार रकमजी व शहापुर पोलीस पथकाने केली असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी आमच्या दैनिक आदर्श महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.

संबंधित पोस्ट