मुरबाड तालुक्यातील नागाव येथे होणार कृषी विज्ञान केंद्र

शहापुर (महेश धानके) : ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विज्ञान केंद्र नसल्याने केंद्र सरकारने मुरबाड तालुक्यातील नागाव येथे कृषी विज्ञान केंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे. भाजपाचे खासदार कपिल पाटील व मुरबाडचे भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने केंद्र साकारणार असून, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना या विज्ञान केंद्राची  मदत होणार आहे.

ठाणे जिल्ह्यासाठी कोसबाड येथे कृषी विज्ञान केंद्र सुरू आहे. मात्र, जिल्हा विभाजनानंतर ते पालघर जिल्ह्यात गेल्यानंतर, मुरबाड, शहापूर ,कल्याण आणि भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान मिळण्यास मर्यादा येत होती. या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड तालुक्यात कृषी विज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. या संदर्भात केंद्र सरकारच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे (आयसीएआर) पाठपुरावा केला होता. त्यानुसार केंद्र सरकारने नागपूर येथील महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफ्सू) प्रशासकीय नियंत्रणाखाली मुरबाड तालुक्यातील नागाव येथे केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या संदर्भात लवकरच करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत.

नागाव येथील २० हेक्टरवर केंद्र उभे राहणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान व आधुनिक शेतीबद्दल प्रशिक्षण मिळू शकेल. या केंद्राच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कार्यशाळा व चर्चासत्राच्या माध्यमातून माहिती पुरविण्यात येईल, अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली.

संबंधित पोस्ट