शासन पालिकांच्या पाठीशी, पण हलगर्जी नको-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना सोबतच इतर बाबींवर मनपा यंत्रणांनी लक्ष केंद्रीत करावे पालिकांनी कोरोना विरुद्ध लढताना दक्षता समित्यांचा प्रभावी उपयोग करावा
- by Adarsh Maharashtra
- Aug 24, 2020
- 1271 views
ठाणे दि २४: शासन पालिकांच्या पाठीशी पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे पालन तितकेच गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील पालिकांनी कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करावा असे सांगितले. तसेच पावसाळीआजार, खड्डे, रस्ते कचरा या इतर बाबींवरही लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली त्यात ते बोलत होते.
या बैठकीस नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्री महोदयांचे सल्लागार अजोय मेहता, आरोग्य प्रधान सचिव, डॉ. प्रदिप व्यास, खा. श्रीकांत शिंदे, आ. संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक यांसह सर्व मनपा आयुक्त, पोलिस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर, कल्याण-डोंबिवली आयुक्त विजय सुर्यवंशी, अदिंनी मनपा क्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.
यावेळी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते, हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही, त्यासाठीच प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु हे करत असतांना आपल्याला कायम सतर्क राहावे लागणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियमांचे नागरिकांनी पालन करावे. कायम सतर्क राहावे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.
आपल्या सर्वांना मास्कचा नियमित वापर करावाच लागणार आहे. वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे आहे.
पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ठाणे मुंबईला लागून आहे. गेले काही महिने सातत्याने कोरोनावर लक्ष दिले गेले परंतू आता आपल्याला इतर बाबींवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे असेही त्यांनी सांगितले. याशिवाय आगामी काळात विविध धर्मिय सण असल्याने पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे.सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असेही त्यांनी सागितले.
कोरोना बरा झाल्यानंतर रुग्णांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर असतो हे लक्षात ठेवुन रुग्णांवर उपचार करावे. तसेच कोराना रुग्णावर उपचार करतांना काळजी घेण्याची गरज आहे. अनावश्यक औषधोपचार टाळण्यावर भर देण्यात यावा. कोरोना बरा झालेल्या रुणांशी यंत्रणांनी एक महिना संपर्क साधावाअसेही त्यांनी सांगितले.
दिवसेंदिवस कोरोनाची लक्षणे बदलत आहेत. लक्षणे विरहीत रुग्णांवर बारकाईने लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले.
यंत्रणेचे तीन भागात विभाजन आहे. लोकप्रतिनिधींनी जनजागृती करण्यावर भर द्यावा. पोलिस व महानगर पालिकांनी ट्रॅकिंग व ट्रेसिंगवर भर द्यावा. चेस द व्हायरस मोहिम प्रभावीपणे राबवावी.रुग्णाला व्हेंटीलेटरपेक्षा ऑक्सीजनची आवश्यकता आहे. रुग्ण बरा होईपर्यंत ऑक्सीजनची व्यवस्था करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कोरोना उपचाराबाबत शंका असल्यास टास्क फोर्सला शंका विचारावी असेही त्यांनी सांगितले. सर्व मनपांच्या मागे शासन ठाम व खंबीरपणे उभे आहे. मात्र प्रयत्नांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही हे स्पष्ट करुन प्रत्येक मनपाने कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातुन प्रभावीपणे काम करावे असे त्यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांना मानसिक आधार देण्याची आवश्यकता आहे. कोरोनावर औषध नाही म्हणून लोक घाबरत आहेत. डॉक्टर-रुग्ण-औषधे यांची गाठ वेळेत होणे आवश्यक आहे. ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि योग्य उपचार यांचा वापर करावा. जनतेमध्ये कोरोना विषयी आजही गैरसमज आहेत. त्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीचा सुयोग्य वापर करुन हे संक्रमाण नियंत्रणात ठेवायचे आहे. प्रयत्न करताना स्वत:ची व कुटुंबाचीही काळजी घ्या असे शेवटी मुख्यमंत्री यांनी आवाहन केले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, सगळयांच्या मेहनतीचे यश दिसते आहे. यंत्रणांनी आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय साधावा. मिशन बिगिन अगेनमध्ये आपण सुरुवात करीत आहेत. त्यासाठी निर्जंतुकीकरण आणि टेस्टिंगवर भर देण्यात यावा. जनजागृती करतांना स्वत:च डॉक्टर न बनता अधिकृत डॉक्टरांवर विश्वास ठेवावा यावर भार द्यावा असे सांगितले.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की,तळगाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खुप महत्त्वाचे काम केले आहे. मुंब्रा विभागात कोरोनाचे काम खुप चांगले झाले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. कळव्यामध्ये सुसज्ज सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळे मुंबई व ठाणे विभागात कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मादान करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही. अदृश्य शत्रूशी आपली लढाई सुरु आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आले असून ते 1:20 प्रमाण केले आहे. फिव्हर क्लिनिक, मोबईल क्लिनिक, जम्बो सुविधा उभारण्यात आल्या आहेत. रुग्ण वाहिकांच्या संख्या वाढविण्यात आल्या आहेत, टेस्टची संख्या वाढविण्यात आल्या आहेत, जिल्हा रुग्णालयातील सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. एमएमआर मध्ये मोठया प्रमाणात सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. या सुविधांच्या गुणवत्ता व दर्जायावर भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांची पसंती मिळते आहे. असेही ते म्हणाले.
कळवा येथे म्हाडाच्या सहकार्याने उभारलेल्या 1100 बेडच्या कोरोना सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. या शिवायकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 20 रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम